बेळगाव लाईव्ह :बेळगावातील नाट्य रसिकांसाठी एकदाच वार्षिक वर्गणी घेऊन वर्षभर त्यांच्यासमोर दर्जेदार व्यावसायिक नाटके, पारितोषिक प्राप्त नाटके आणि प्रायोगिक रंगभूमीवरील नाट्य प्रयोग सादर करण्याची ‘नाट्यदिंडी’ ही अभिनव योजना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बेळगाव शाखेने प्रायोगिक तत्त्वावर राबवण्याचा निर्णय घेतला असून योजनेचा शुभारंभ येत्या रविवार दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी होईल. सदर योजना एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीसाठी वार्षिक वर्गणीदारांपुरतीच मर्यादित असणार आहे, अशी माहिती अ. भा. मराठी नाट्य परिषद बेळगाव शाखेच्या अध्यक्ष विणा लोकूर यांनी दिली.
शहापूर महात्मा फुले रोड येथील काॅपर लीफ उपहारगृहामध्ये आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. विणा लोकूर यांनी सांगितले की अ. भा. मराठी नाट्यपरिषद बेळगाव शाखेचा दर्जेदार नाटके पारितोषिक प्राप्त नाटके आणि प्रायोगिक रंगभूमीवरील नाट्यप्रयोग बेळगावच्या रसिकांसाठी सादर करण्याचा मानस आहे. त्यासाठी वार्षिक वर्गणी घेऊन बेळगावच्या रसिक प्रेक्षकांसाठी केवळ वर्षभरासाठी प्रायोगिक तत्त्वावर नाटकांच्या सादरीकरणाचा हा उपक्रम राबविला जाईल. प्रत्येक नाटक शहरातील शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज समोरील कन्नड भवन येथे सायंकाळी ठीक 6 वाजता सुरू होईल. फक्त 300 दर्दी प्रेक्षकांना या योजनेचा आनंद लुटता येणार आहे. साधारण दोन महिन्याच्या कालावधीत एक नाटक आणण्यात येईल. वर्षभरासाठी एकदाच पैसे भरले की येणाऱ्या प्रत्येक नाटकासाठी आपला प्रवेश निश्चित होईल. सदर योजना प्रथम वर्गणी भरणाऱ्या तीनशे प्रेक्षकांसाठी मर्यादित असल्यामुळे वार्षिक वर्गणीनुसार आसनांची संख्या अनुक्रमे (वार्षिक वर्गणी व खुर्च्या यानुसार) पुढील प्रमाणे असेल. रु.12000 -12, रु.10000 -41, रु.7000 -65, रु.4000 -46, रु.3000 -77, रु.2000 -60 अशी माहिती लोकूर यांनी दिली.
सदर योजना एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीसाठी असून या योजनेअंतर्गत चार नावाजलेली व्यावसायिक नाटके आणि दोन प्रायोगिक नाटके किंवा एखादा नावाजलेला रंगमंचीय कार्यक्रम असे एकूण सहा कार्यक्रम सादर केले जातील. योजनेअंतर्गत वर्गणीदार प्रेक्षकांना एकूण सहा नाटकांचा पास दिला जाईल. त्या पासवर आसन क्रमांक असणार नाही ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह’ या तत्त्वाने प्रेक्षकांनी आपल्या सीटवर नाटक सुरू व्हायच्या आधी स्थानापन व्हायचे आहे. नाट्यदिंडी योजनेतील 300 प्रेक्षकांचा एक व्हाट्सअप ग्रुप केला जाईल दोन महिन्यातून एकदा सादर होणाऱ्या नाटकांची माहिती आपल्याला सदर ग्रुपद्वारे सादरीकरणाच्या 10 ते 15 दिवस आधी देण्यात येईल.
या योजनेच्या शुभारंभ येत्या रविवारी 16 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता वरेकर नाट्यसंघ टिळकवाडी, बेळगाव येथे होणार आहे. त्याचे औचित्य साधून दि. 16 व 17 फेब्रुवारी या दोन दिवशी जे रसिक आपले सीझन तिकीट बुक करतील त्यांना 5 टक्के डिस्काउंटची विशेष सवलत दिली जाणार आहे. सीझन तिकिटासंदर्भात इच्छुकांनी सीए पुष्कर ओगले (9008943850) यांच्याशी संपर्क साधावा, असे सांगून बेळगावच्या नाट्य रसिकांनी या योजनेला भरघोस प्रतिसाद देऊन दर्जेदार नाटकांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्षा विणा लोकूर यांनी केले.
पत्रकार परिषदेप्रसंगी अभा मराठी नाट्य परिषद बेळगाव शाखेच्या उपाध्यक्ष गीता कित्तूर, मुख्य कार्यवाह सीए पुष्कर ए ओगले आणि माजी अध्यक्ष प्रा. संध्या देशपांडे उपस्थित होते.