बेळगाव लाईव्ह :मुळात भाषा हीच धर्माची व्याख्या आणि ओळख करून देत असल्यामुळे भाषा ही अग्रगण्य मानली पाहिजे. आपली मातृभाषाच धर्माला समृद्ध बनवते. आपल्या मराठी भाषेचं संवर्धन करण्याची जबाबदारी ही पालक, शिक्षकांबरोबरच समाजाचीही आहे, असे प्रतिपादन खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी केले.
कोरे गल्ली शहापूर व महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्यावतीने कोरे गल्ली येथील गंगापुरी मठ येथे वि. वा. शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांची 113 वी जयंती व मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख वक्ते या नात्याने पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गल्लीतील ज्येष्ठ पंच सोमनाथ कुंडेकर हे होते.
व्यासपीठावर नगरसेवक शिवाजी मंडोळकर, शिवसेनेचे राजकुमार बोकडे, ज्येष्ठ पंच शिवाजी हावळणाचे व शिक्षिका सौ.सुमित्रा मोडक उपस्थित होत्या. प्रारंभी रणजित हावळणाचे यांनी स्वागत व प्रास्ताविक केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
धनंजय पाटील यांनी मराठी भाषा व संवर्धन यावर मार्गदर्शन करताना धर्म प्रथम की भाषा यावर बराच उहापोह होतो, पण मुळात भाषा हीच धर्माची व्याख्या आणि ओळख करून देते त्यामुळे भाषा ही अग्रगण्य मानली पाहिजे, आपली मातृभाषाच धर्माला समृद्ध बनवते, आपल्या मराठी भाषेचं संवर्धन करण्याची जबाबदारी ही पालक,
शिक्षकांबरोबरच समाजाचीही आहे, प्रत्येकाने आपल्या पाल्याला पाचवी पर्यंतचे शिक्षण मराठीतून म्हणजेच आपल्या मातृभाषेतून दिले पाहिजे, जेणेकरून त्याचा मेंदू प्रगल्भ होईल व समाजात वावरताना कोणताही न्यूनगंड राहणार नाही. बेळगाव परिसरात बोली भाषा म्हणून ग्रामीण भाषा जास्त बोलली जाते. त्या ग्रामीण भाषेला अधिक समृद्ध केले पाहिजे, जेणेकरून आपल्या भाषा व संस्कृतीचे जतन होईल असे सांगून ज्यांनी ज्यांनी सार्वजनिक जीवनात यशस्वी झेप घेतलेली आहे,
त्यांनी आपल्या मातृभाषेतूनच शिक्षण घेतलेले आहे. म्हणून आपणही आपली मराठी भाषा शिकतांना किंवा बोलताना कोणताही न्यूनगंड न बाळगता ती आत्मसात केली पाहिजे, असे प्रतिपादन धनंजय पाटील यांनी केले.
त्याच बरोबर मराठी शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनी आपल्या मुलांना मराठीतच शिक्षण दिले पाहिजे. त्यांचा कल इंग्रजीकडे जास्त ओढला गेलेला दिसत असून ही मराठीसाठी व त्यांच्यासारख्या असंख्य लोकांच्या नोकरीसाठी धोक्याची घंटा आहे. तरी शिक्षकांनी वेळीच सावध व्हावे व माजी विद्यार्थी संघटनांनींनी आपल्या शाळेत एक दिवसासाठी कार्यक्रम न करता शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या कशी वाढेल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे असे मतही पाटील यांनी व्यक्त केले.
कोरे गल्ली पंच कमिटी व महाराष्ट्र एकीकरण समिती, रामलिंगवाडी येथील कार्यकर्त्यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अयोजकांतर्फे कोरे गल्ली येथील अंगणवाडी ते सातवी पर्यंतचे शिक्षण मराठीतून घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमास कोरे गल्ली पंच शांताराम मजुकर, शिवाजी मजुकर, गजानन शहापूरकर, राजाराम मजुकर, मोहन पाटील, अभिजीत मजुकर, राजू गावडोजी, किरण पाटील,परशराम शिंदोळकर, आनंद पाटील, रवी जाधव, गोकुळ पाटील, राजेश सावंत, साईनंद चिगरे, दीपक गोंडवाडकर, विजय ढम, युवा समिती सीमाभागचे मनोहर हुंदरे, प्रवीण रेडेकर, विजय जाधव, राजू पाटील, इंद्रजीत धामणेकर, सुरज जाधव आदी उपस्थित होते. सुधीर नेसरीकर यांनी आभार मानले.