बेळगाव लाईव्ह : बेळगाव : सीमाभागातील भाषिक अल्पसंख्यांकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि प्रशासनासोबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे सहआयुक्त एस. शिवकुमार मंगळवारी (दि. १८) व बुधवारी (दि. १९) बेळगाव दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असून, जिल्हास्तरीय समितीची बैठक, मराठी शाळांची पाहणी आणि राष्ट्रीय महामार्गावरील फलकांबाबतची मागणी या सर्व बाबींवर आयोगाच्या सहआयुक्तांकडून आढावा घेतला जाणार आहे.
सीमाभागातील भाषिक अल्पसंख्यांकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणी समजून घेण्यासाठी सहआयुक्त एस. शिवकुमार यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना पत्र लिहून जिल्हास्तरीय भाषिक अल्पसंख्याक समितीची बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीत सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांना येणाऱ्या प्रशासकीय व शैक्षणिक समस्यांवर चर्चा होणार आहे.
मराठी माध्यमाच्या शाळांना सीमाभागात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शाळांची अवस्था, विद्यार्थीसंख्या, शैक्षणिक सुविधा यांचा आढावा घेण्यासाठी सहआयुक्त शिवकुमार यांनी मराठी शाळांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ यांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. मराठी शाळांवर असलेल्या निर्बंधांबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय महामार्गावर मराठी भाषेत फलक उभारण्याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने आयोगाकडे मागणी केली होती. या मागणीची दखल घेत सहआयुक्तांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सीमाभागातील महत्त्वाच्या ठिकाणी मराठी फलक असावेत, या मागणीसंदर्भात अधिकाऱ्यांकडून उत्तर मागितले जाणार आहे.
भाषिक अल्पसंख्यांकांच्या समस्यांवर थेट संवाद साधण्यासाठी बुधवारी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात मराठी भाषिक संघटनांना आपल्या अडचणी व मागण्या मांडण्याची संधी मिळणार आहे. सीमाभागातील मराठी नागरिक, शिक्षक संघटना, शाळा व्यवस्थापन समित्या आणि इतर सामाजिक गटांनी या बैठकीला हजेरी लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या या दौऱ्यात सीमाभागातील अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जाणार असून, मराठी भाषिकांसाठी सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर आणि आयोगाच्या पुढील निर्णयांवर मराठी भाषिकांचे लक्ष राहणार आहे.