बेळगाव लाईव्ह : बनावट कागदपत्रांच्या आधारे जमीन हस्तांतरित करून फसवणूक केल्याप्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. 20 एप्रिल 2023 रोजी विनिता विजय असगावकर (रा. मुंबई) यांनी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या मृत सासू कमलाबाई यशवंत प्रभू असगावकर यांना एकूण 12 अपत्य होते. तक्रारदार महिलेचे पती विजय असगावकर यांचे दि. 27 जुलै 2003 रोजी निधन झाले होते, तर कमलाबाई यांचे दि. 22 जुलै 2001 रोजी निधन झाले.
मृत्यूपूर्वी कमलाबाईंनी तक्रारदार महिलेच्या पती विजय असगावकर यांच्या नावाने मृत्युपत्र तयार करून, बेळगाव बाची येथील आर. एस. नंबर 59, 60, 62/1, एकूण 8 एकर 21 गुंठे जमीन त्यांच्या मुलाच्या नावावर द्यावी, असा उल्लेख केला होता. मात्र, काही कारणांमुळे ती मालमत्ता त्यांच्या पतीच्या नावावर हस्तांतरित करण्यात आलेली नव्हती.
यानंतर, सदर जमीन 20 एप्रिल 2023 रोजी बेळगाव सब-रजिस्ट्रार कार्यालयात आरोपी क्रमांक 1, सागर दत्तात्रय जाधव यांना विकण्यात आल्याचे नोंदवण्यात आले. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात भादंवि कलम 465, 467, 468, 471, 420 आणि 120 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, सागर दत्तात्रय जाधव (रा. कंग्राळी बी. के.), सुरेश यल्लप्पा बेळगावी (रा. मुत्यानट्टी), शांता मोहन नार्वेकर (रा. साहूकार गल्ली, कडोली), हारुण रशीद अब्दुल मजीद तहसीलदार (रा. कचेश्वर गल्ली, कडोली) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी मृत कमलाबाई यशवंत प्रभू असगावकर यांच्या नावाने बनावट कागदपत्र तयार करून, आरोपी क्रमांक 3 हिला मालकी हक्क असलेली मालमत्ता असल्याचे दर्शवले.
नंतर बेळगाव नोंदणी कार्यालयात कागदपत्र तयार करून, सदर मालमत्ता आरोपी क्रमांक 1 याच्या नावावर हस्तांतरित करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यामध्ये आणखी काही व्यक्ती सामील असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.