बेळगाव लाईव्ह : बस कंडक्टरवरील हल्ल्याच्या निषेधार्थ बेळगावमध्ये आंदोलन करण्यासाठी दाखल झालेला कर्नाटक रक्षण वेदिकेचा अध्यक्ष नारायण गौडा याने महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना विरोधात गरळ ओकताना समिती आणि शिवसेनेची पाकिस्तानी दहशतवाद्यांशी तुलना करून स्थानिक राजकीय नेत्यांवर टीका केल्यामुळे सीमा भागात संतापाची लाट मिसळली आहे.
प्रवाशाला कन्नडमध्ये बोल असे म्हणणाऱ्या बस कंडक्टरवर हल्ला करण्याच्या घटनेचा निषेधार्थ बेळगाव मध्ये मोठे आंदोलन छेडण्यासाठी करवे अध्यक्ष नारायण गौडा हा आज मंगळवारी सकाळी बेळगाव दाखल झाला आहे. शहरात दाखल होताच त्याने प्रसिद्धी माध्यमांसमोर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेसह स्थानिक राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली. नेहमीप्रमाणे समिती विरुद्ध गरळ ओकताना त्याने महाराष्ट्र एकीकरण समितीची पाकिस्तानी दहशतवाद्यांशी तुलना केली.
तसेच समिती आणि शिवसेना यांच्यात काही फरक नाही. शिवसेना, समितीचे कार्यकर्ते आणि पाकिस्तानी आतंकवादी एकसारखेच आहेत. बेळगावमधील मराठी गुंडांचे गैरवर्तन माझ्या निदर्शनास आले आहे. कर्नाटकच्या बसेसना काळे फासायचे बसवाहकाच्या तोंडून ‘जय महाराष्ट्र’ वदवून घ्यायचे वगैरे सर्व गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या आहेत. बेळगाव मधून महाराष्ट्र एकीकरण समिती संपली असल्यामुळेच पोट दुखीने
समिती असे कृत्य करत आहे.
मात्र तुमची गुंडगिरी महाराष्ट्रातच ठेवा, तुम्ही एका कंडक्टरला मारहाण केलीत तर आम्ही शेकडो मराठी गुंडांना ठोकून काढू. कर्नाटकच्या वीरांचा इतिहास एकदा आठवून पहा असे सांगून बेळगावात राहणाऱ्या प्रत्येक मराठी भाषिकाला ‘जय कर्नाटक’ म्हणावे लागेल अशी वेळ आणू, अशी दर्पोक्ती नारायण गौडा यांने केली.
मराठीच्या प्रशासकीय भाषेतील अंतर्भाव बद्दल बोलताना बेळगावची प्रशासकीय भाषा कन्नड आहे हे जिल्हाधिकाऱ्यांनी ध्यानात घ्यावे. त्यामुळे त्यांनी समितीने त्यांना मराठी कागदपत्रांबाबत आश्वासन देऊ नये. अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधातही आंदोलन छेडू असा इशारा त्यांने दिला. कंडक्टर वर हल्ला करणारे आणि त्याच्यावर पोक्सो खटला दाखल करण्यास कारणीभूत प्रवासी यांना पोलीस आयुक्त, संबंधित पोलीस निरीक्षकाने मुस्कटात मारून चांगली समज द्यायला हवी. बस कंडक्टर वर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला तात्काळ निलंबित केले जावे. याबाबतीत बेळगावचे राजकीय नेते कांही बोलण्यास तयार नाहीत.
येथील राजकीय नेत्यांनी आपला कन्नड स्वाभिमान दाखवला पाहिजे. तुम्ही येथे नमते घ्याल तर बेंगलोरला आल्यानंतर आम्ही तुमचे कसे स्वागत करायचे ते आम्ही पाहून घेऊ. गृहमंत्र्यांनी या संदर्भात बोलले पाहिजे असे सांगून करवे अध्यक्ष नारायण गौडा याने सरकार आणि गृहमंत्र्यांवर टीका केली.