बेळगाव लाईव्ह : फळांचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘हापूस’ आंब्याची आवक बेळगावात झाली असून हापूस आंब्याच्या मुहूर्तपेटीची आज पहिली विक्री 4500 रुपये डझन इतक्या रुपयांना झाली. फळविक्रेते एम. बी. देसाई यांच्या दुकानात दाखल झालेल्या आंब्याच्या पेटीचा लिलाव आज मोठ्या उत्साहात पार पडला. असंख्य आंबाप्रेमींच्या उपस्थितीत बेळगावात दाखल झालेल्या हापूसची विक्री झाली असून फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यापासून बेळगावकरांना हापूसची चव चाखता येणार आहे.
‘आंबा पिकतो, रस गाळितो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो’… कोकणचा राजा म्हणून प्रसिद्ध असणारा मधुर फळांचा राजा बेळगावात दाखल झाला आहे. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आणि खवय्यांना मोहिनी घालणारा आंबा हा नेहमीच रसिकांच्या पसंतीची दाद मिळवत असतो. बेळगावात नेहमीच त्याच्या आगमनाचे नेहमीच स्वागत केले जाते. आज त्याच्या पहिल्या २० पेट्यांची विक्री लिलावातून करण्यात आली .
बेळगावातील होलसेल फ्रुट मार्केट मधील एम. बी. देसाई यांच्या दुकानात नेहमीच सर्वप्रथम हापूस आंब्याची आवक होते. १९५२ पासून सलग ७२ वर्षे हापूस आंब्याची मुहूर्तपेटी विक्री करण्याची परंपरा असलेल्या या दुकानात यंदाही मोठ्या उत्साहात हापूस आंब्याच्या मुहूर्तपेटीचा लिलाव करण्यात आला. सध्या जरी आंब्याचे दर चढे असले तरी येत्या काही दिवसात बाजारपेठेत आंब्याची आवक वाढल्यानंतर दर कमी होतील. एम. बी. देसाई यांच्या दुकानात झालेल्या लिलावात एम. बी. देसाई फर्मचे संचालक संदीप देसाई यांनी मुहूर्तपेटीचा लिलाव केला. यावेळी अनेक आंबाप्रेमींनी बोलीत सहभाग घेतला. पहिल्याच दिवशी आंबाप्रेमींनी मोठ्या प्रमाणात पसंती देत लिलाव प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सध्याच्या ट्रेंडनुसार अनेक लोक कोकणपट्ट्यातून आंब्याची आवक करत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच आपल्या नातेवाईकांच्या, पै-पाहुण्यांच्या, मित्रपरिवाराच्या माध्यमातून थेट आंबा उत्पादकांपासून ग्राहकांपर्यंत सेवा मिळत असल्याने कोकण किनारपट्टीवरील देवगड, रत्नागिरी, चिपळूण, सावंतवाडी, राजापूर, मालवण आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक होते.
मात्र आंबा प्रेमींकडून देवगड हापूसला अधिक पसंती देण्यात येते. बेळगावकरांचे आंबाप्रेम पाहता बेळगावमध्ये प्रशासनाच्यावतीने दरवर्षी आंबा महोत्सव देखील आयोजित केला जातो. या महोत्सवात तब्बल ५०० हुन अधिक आंब्याच्या प्रजाती पाहायला मिळतात. कोकणातील आंबा दाखल होण्यापूर्वी सहसा कर्नाटकातील आंबा बाजारपेठेत दाखल होतो. मात्र यंदा कोकणातील आंब्याने सर्वप्रथम बाजी मारली असून कोकणातील आंब्याची चव व गोडी आंबाप्रेमींना भुरळ घालत आहे.
साधारण मार्च महिन्याच्या सुरुवातील दाखल होणारा आंबा यंदा फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात दाखल झाल्याने आंबाप्रेमींनी आतापासूनच आंब्याची चव चाखता येणार आहे.