Thursday, February 6, 2025

/

केदनुर ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील केदनुर ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई केली जावी अशी मागणी मारुती भागन्ना राजाई यांच्यासह केदनुर आणि मन्नीकेरी येथील ग्रामस्थांनी बेळगाव जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.

केदनुर आणि मन्नीकेरी येथील ग्रामस्थांनी मारुती राजाई यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज गुरुवारी सकाळी जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांना सादर केले निवेदनाचा स्वीकार करून सीईओ शिंदे यांनी मागणीची त्वरेने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. जि. पं. सीईओंना सादर करण्यात आलेल्या निवेदनात केदनुर ग्रामपंचायतीमध्ये कशाप्रकारे भ्रष्टाचार करण्यात आला आहे याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे.

त्यासंदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना केदनुर येथील मारुती भागन्ना राजाई यांनी केदनूर ग्रामपंचायत मध्ये 2020 ते 2024 या कालावधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे सांगितले.

नरेगा योजनेअंतर्गत रस्ते, गटारी, विहिरी निर्मितीच्या नावाखाली खोटी कागदपत्रे तयार करून हा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. प्रत्यक्षात रस्ते गटारी विहिरी संदर्भातील विकास कामे न करता त्यांची बिले सादर करून पैसे उकळण्यात आले आहेत. पूर्वी केदनुर ग्रामपंचायतच्या पीडीओ लक्ष्मी कांबळे या होत्या आणि सध्याचे विद्यमान पीडीओ वडगावकर हे आहेत.Dc zp

त्याचप्रमाणे सध्याच्या विद्यमान ग्रामपंचायत अध्यक्षा सविता महादेव संभाजी या आहेत. यापूर्वीच्या म्हणजे 2020 मध्ये काशव्वा होसमणी मन्नीकेरी या अध्यक्षा होत्या. अलीकडे ग्रामपंचायतीतील हा भ्रष्टाचार निदर्शनास आल्यानंतर आम्ही ग्रामस्थांनी बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यासाठी आम्ही आज येथे आलो आहोत.

सदर भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे, अशी माहिती राजाई यांनी दिली. आज निवेदन सादर करतेवेळी एस. के. राजाई, शंकर बर्गे, जे. एल. पाटील, डी. एस. पाटील, केदारी राजाई, भरमू संभाजी, मारुती कलखांब, रामा राजाई, खीरू राजाई, मारुती सनदी आदींसह केदनुर आणि मन्नीकेरी येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.