बेळगाव लाईव्ह : बेळगाव ते मिरज विशेष रेल्वेला प्रवासी रेल्वे म्हणून धावण्याची परवानगी द्यावी. तसेच धारवाड ते बेळगाव ही वंदे भारत रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करण्याची तारीख निश्चित करावी, अशी मागणी आपण केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली असल्याची माहिती खासदार इरण्णा कडाडी यांनी दिली.
शहरात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. खासदार कडाडी म्हणाले की, बेळगाव ते मिरज दरम्यान धावणाऱ्या सध्याच्या विशेष रेल्वेचे प्रवास भाडे अव्वाच्या सव्वा आहे. ही रेल्वे सर्वसामान्य लोक वापरत असल्याने तिचे लवकरात लवकर सर्वसामान्य प्रवासी रेल्वेमध्ये रूपांतर करणे. तसेच ही रेल्वे सतत सुरू ठेवून प्रवाशांना कमी भाड्यात सुविधा देणे अत्यंत आवश्यक आहे.
यासाठी मी बेळगाव मिरज विशेष रेल्वेला प्रवासी रेल्वे म्हणून धावण्याची परवानगी द्यावी अशी विनंती रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. त्याचप्रमाणे धारवाड ते बेळगावपर्यंतच्या वंदे भारत रेल्वेच्या विस्तारास आडकाठी ठरत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे या रेल्वेचे वेळापत्रक आणि तारीख लवकरात लवकर जाहीर करण्याची विनंती देखील मी केली आहे.
माझ्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देताना केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी शक्य तितक्या लवकर बेळगाव -मिरज दरम्यान प्रवासी रेल्वे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
तसेच सर्व तांत्रिक अडचणी टप्प्याटप्प्याने सोडवण्यात आल्यामुळे धारवाड ते बेळगाव पर्यंतचा वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचा विस्तार लवकरच होईल असे आश्वासन दिले आहे, अशी माहिती खासदार इरण्णा कडाडी यांनी दिली.