बेळगाव लाईव्ह : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प समाजातील सर्व स्तरांवर विशेषतः गरीब आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी तसेच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेला ऐतिहासिक आणि स्वागतार्ह अर्थसंकल्प आहे, असे मत बेळगाव लोकसभा खासदार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केले आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीयांसाठी मोठी सवलत देण्यात आली असून 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या नागरिकांना कोणताही कर लागू नसेल. तसेच शेतकऱ्यांसाठी ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना’ जाहीर करण्यात आली आहे. देशातील 100 जिल्ह्यांमध्ये कमी उत्पादन असलेल्या शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहे. पंचायत स्तरावर अन्नधान्य प्रक्रिया उद्योगांना चालना दिली जाणार असून ही योजना राज्य सरकारांच्या सहकार्याने राबवली जाईल. याशिवाय किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत 1.7 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून कर्ज मर्यादा 3 ते 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
देशभरात लघु उद्योगांच्या माध्यमातून 7.5 कोटी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अत्यंत लहान उद्योगांसाठी स्वतंत्र क्रेडिट कार्ड सुविधा देण्यात येणार आहे. अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योगांसाठी 2 कोटी रुपयांपर्यंत कर्ज अनुदान देण्यात येणार आहे. ‘सक्षम अंगणवाडी 2.0’ योजना सुरू करण्यात आली असून अंगणवाडी केंद्रांद्वारे पोषण आहार पुरवला जाणार आहे.
शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी 50 कोटी सरकारी शाळांमध्ये ‘अटल टिंकरिंग लॅब’ सुरू करण्यात येणार आहेत. सरकारी माध्यमिक शाळांना इंटरनेट सुविधा देण्यात येणार असून पुढील 10 वर्षांत IIT मधील विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी जागा 130 टक्क्यांनी वाढवण्यात येणार असून गरीबांसाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कर्करोग उपचार विभाग सुरू करण्यात येणार आहे. तसेच 36 प्रकारच्या कर्करोग आणि गंभीर आजारांवरील औषधांवरील आयात कर माफ करण्यात आला आहे.
रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांसाठी विशेष कर्ज सुविधा देण्यात येणार आहे. ‘जल जीवन मिशन’ 2028 पर्यंत वाढविण्यात आले असून शहरांच्या विकासासाठी 1 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ‘उडान’ योजनेंतर्गत 220 नवीन शहरांना विमानसेवा पुरवण्यात येणार असून या योजनेचा कालावधी आणखी तीन वर्षे वाढवण्यात आला आहे. तसेच पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकारांच्या सहकार्याने 50 हजार पर्यटन स्थळे विकसित केली जाणार आहेत. शैक्षणिक कर्जावरील कर सवलत वाढवण्यात आली आहे.
एकूणच हा अर्थसंकल्प भारताच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरेल, असे मत खासदार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केले. तसेच उत्तम अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे.