बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर इंग्लिश मीडियम हायस्कूल या आमच्या शाळेने कॉज टू कनेक्ट फाउंडेशन नावाच्या ना-नफा संस्थेशी एकीकरण करून आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा बहुकौशल्य विकास कार्यक्रम सुरू केला आहे.
शाळेच्या ‘वी मेक वर्दी सिटीझन्स’ या ब्रीदवाक्याला पूर्णतः पूरक असा हा उपक्रम असून या अंतर्गत मूलभूत कार्यशाळा आणि अभियांत्रिकी तंत्र, मूलभूत ऊर्जा आणि पर्यावरण, मूलभूत शेती आणि पशुपालन, मूलभूत पाकशास्त्र आणि आरोग्य याचे प्रशिक्षण दिले जाते, अशी माहिती बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीचे सदस्य डॉ. अजित कुलकर्णी आणि श्रीमती अलका कुलकर्णी यांनी दिली.
टिळकवाडी दुसरे रेल्वे गेट येथील एम. व्ही. हेरवाडकर इंग्रजी माध्यम माध्यमिक शाळेमध्ये आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. शाळेबद्दल माहिती देताना त्यांनी सांगितले की, बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीची टिळकवाडी येथील एम. व्ही. हेरवाडकर इंग्लिश मीडियम हायस्कूल ही 1981 मध्ये अतिशय साध्या पद्धतीने सुरू झालेली इंग्रजी माध्यमिक शाळा गेल्या चारहून अधिक दशकांच्या आपल्या यशस्वी वाटचालीनंतर आता तीन स्वतंत्र आणि विशेष आधुनिक युनिटच्या अतिशय चांगल्या प्रकारे बांधलेल्या आणि सुसज्जित समूहात विकसित झाली आहे.
‘वी मेक वर्दी सिटीझन्स’ अर्थात ‘आम्ही योग्य नागरिक घडवतो’ हे आमच्या शाळेचे इयत्ता पहिली ते दहावीचे ब्रीद वाक्य आहे. आमची शाळा बेळगावमधील पहिली विनाअनुदानित इंग्रजी माध्यम शाळा आहे. आमचा प्राथमिक विभाग बेळगाव शहरातील सर्वोत्तम म्हणून ओळखला जाऊ शकतो. हसत खेळत (प्ले वे मेथड) पद्धतीने शिकवण्याची संकल्पना आमच्या शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागात म्हणजे राजकुमार जांग्रा केजी सेक्शनमध्ये राबविली जाते. ऐका, दृश्यमान करा आणि व्यवहारिकरित्या करा या तीन पैलूंचे संयोजन करणे हा ज्ञान देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे ज्याचे अनुकरण आम्ही नव्या प्राथमिक विभागात करत आहोत. आमच्याकडे गणित, विज्ञान आणि संगणक शास्त्राच्या प्रयोगशाळा आहेत. प्रत्येक विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी या तीन प्रयोग शाळांमध्ये वैयक्तिकरित्या काम करतो. नैतिक विज्ञान वर्गादरम्यान समृद्ध भारतीय संस्कृतीला विशेष प्राधान्य दिले जाते ज्याचा आधार संस्कृत आहे प्रकल्प भाषा आणि छंद वर्गांस मध्ये व्यावहारिक प्रशिक्षणासाठी दररोज एक ठराविक कालावधी समर्पित केला जातो.
अलीकडेच आमच्या शाळेने ‘कॉज टू कनेक्ट फाउंडेशन’ नावाच्या एका ना-नफा संस्थेशी एकीकरण केले असून स्वयंपूर्ण स्वावलंबन आणि स्वावलंबी समाज निर्माण करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. सदर उद्दिष्ट आमच्या शाळेच्या ‘वी मेक वर्दी सिटीझन्स’ या ब्रीद वाक्याला पूर्णतः पूरक आहे. हा नवीन बहुउद्देशीय विकास कार्यक्रम विद्यार्थ्यांना मूलभूत कार्यशाळा आणि अभियांत्रिकी तंत्र, मूलभूत ऊर्जा आणि पर्यावरण, मूलभूत शेती आणि पशुपालन, मूलभूत पाकशास्त्र आणि आरोग्य याचे प्रशिक्षण प्रशिक्षण देतो. इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी समर्पित अशा या कार्यक्रमांतर्गत तज्ज्ञ प्राध्यापकांकडून दोन वर्षाच्या कालावधीसाठी व्यावहारिक प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी शाळेच्या परिसरात आधीच एक कार्यशाळा उभारण्यात आली आहे.
आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना या नवीन कौशल्य विकास कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाते आणि पुढील वर्षी नववीपर्यंत हा कार्यक्रम राबविला जातो. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आणि आवश्यक परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. एम. व्ही. हेरवाडकर शाळेसाठी आणखी एक मानाचा तुरा म्हणजे शाळेने मागील वर्षापासून एस.एस.एल.सी. अभ्यासक्रमात संस्कृत ही तिसरी भाषा म्हणून समाविष्ट केली आहे.
या भाषेचे अध्यापन इयत्ता सहावीपासून सुरू आहे अशी माहिती देऊन एकंदर आपल्या विद्यार्थ्यांना उद्याचे योग्य नागरिक बनवण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी भविष्यातही विविध उपक्रम सुरू करण्याचा शाळा व्यवस्थापनाचा मानस असल्याचे डॉ. अजित कुलकर्णी व श्रीमती अलका कुलकर्णी यांनी शेवटी दिली.