बेळगाव लाईव्ह : राज्य सरकारच्या आगामी अर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागासाठी आणि बेळगावमध्ये उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी आवश्यक निधीची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासोबतच कंत्राटदारांच्या थकबाकी बिल अदा करण्यासाठीही सरकार आवश्यक ती पावले उचलणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
राज्य सरकारकडून अर्थसंकल्प पूर्व बैठकांचे आयोजन करण्यात आले असून विविध विभागांसाठी अनुदानाची मागणी केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी या संदर्भात बोलताना सांगितले, बेळगावमध्ये उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी आम्ही निधीची मागणी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागासाठीही अधिक निधीची तरतूद होईल, अशी अपेक्षा आहे. याशिवाय, राज्यभरातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून पायाभूत सुविधा विकसित केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. कंत्राटदारांचे थकबाकी बिल अदा करण्यासाठी लवकरच सरकार निर्णय घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी कमी मिळत असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना, या संदर्भात संबंधित विभाग योग्य ती कारवाई करत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प मार्गी लावण्यात आले आहेत. पुढील काळातही कंत्राटदारांना संधी देत विकासकामांना गती दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, सर्व निर्णय फक्त बंगळुरूपुरते मर्यादित न ठेवता विभागवार वाटप करावे, अशी शिफारसही करण्यात आल्याचे जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. तसेच मी दिल्लीला जाण्याचा कोणताही विचार केलेला नाही. राज्यातच अनेक महत्त्वाची कामे आहेत आणि त्यावर लक्ष केंद्रित करणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.