बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या रस्त्यांवरील वाढलेली वाहतूक लक्षात घेत वाहतूक नियंत्रणासाठी बेळगाव शहरात विविध ठिकाणी फ्लायओव्हर आणि रिंगरोड प्रकल्प हाती घेण्यात येणार असून राष्ट्रीय महामार्ग लगत असणाऱ्या हॉटेल संकम पासून राणी चन्नम्मा चौकापर्यंत प्रस्तावित फ्लायओव्हर आता राज्य सरकारच्या माध्यमातून उभारला जाणार आहे.
यंदाच्या राज्य बजेटमध्ये या प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
बेळगाव शहराच्या विकासासाठी प्रस्तावित फ्लायओव्हर आणि रिंगरोड निर्मितीसाठी राज्य सरकारच्या बजेटमध्ये मंजुरी मिळावी, शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.
या बैठकीत प्रस्तावित फ्लायओव्हर आणि रिंगरोड प्रकल्पाचा नकाशा तपासण्यात आला. तसेच कोणत्या कोणत्या भागांचा समावेश करता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली.
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि वाढत्या रहदारीला नियंत्रणात ठेवण्यासाठी फ्लायओव्हर व रिंगरोड गरजेचा आहे, असे मत या बैठकीत मांडण्यात आले.
या बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बनयांग यांच्यासह अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.