बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडविण्यासाठी कर्नाटक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कायमस्वरूपी संचार न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. ग्राहकांना न्याय मिळावा यासाठी या न्यायालयाची स्थापना झाली असून, मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी या निर्णयाचे स्वागत करत ग्राहक न्यायासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे प्रतिपादन केले.
सेवेतील त्रुटी, अनधिकृत दरवाढ, उत्पादनांची निकृष्टता तसेच ग्राहकांची फसवणूक यांसारख्या तक्रारी त्वरित सोडविण्यासाठी बेळगाव जिल्ह्यात “कर्नाटक राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कायमस्वरूपी संचार न्यायालयाची” स्थापना करण्यात आली आहे. यामुळे या भागातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार तसेच विधी व मापनशास्त्र मंत्री के. एच. मुनियप्पा यांनी सांगितले.
बेळगाव येथील आटो नगर परिसरातील सहकारी बँकेच्या इमारतीत स्थापन झालेल्या या संचार न्यायालयाचे उद्घाटन मंत्री के. एच. मुनियप्पा यांच्या उपस्थितीत झाले. ग्राहक न्यायालयासाठी प्रत्येक वेळी बंगळुरूस धाव घेणे गरजेचे ठरू नये, यासाठी जिल्ह्यात हे संचार न्यायालय स्थापन करण्यात आले.
या न्यायालयामुळे कमी खर्चात तक्रारींचे निराकरण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ग्राहक आयोगाच्या या न्यायालयामुळे ग्राहक तक्रारींवरील निकाल लवकर लागण्यास मदत होईल. ग्राहक आयोग विवादित प्रकरणे सोडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करणार असून, ग्राहक हक्क संरक्षणासाठी हे पाऊल उचलल्याचे मंत्री मुनियप्पा यांनी सांगितले.
कर्नाटकचे कायदा, संसदीय व्यवहार आणि पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी सांगितले की, उत्तर कर्नाटकसाठी हे संचार न्यायालय अत्यंत महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या प्रयत्नांमुळे आज हे स्थापन करता आले. या न्यायालयामुळे ग्राहक न्यायालयीन प्रक्रिया वेगवान होईल आणि ग्राहकांना वेळीच मदत मिळेल, असे त्यांनी नमूद केले. बेळगाव जिल्ह्यात सुमारे २००० हून अधिक ग्राहक तक्रारी प्रलंबित आहेत. या तक्रारी लवकरात लवकर निकाली निघाव्यात, यासाठी या संचार न्यायालयाने कार्यक्षमतेने काम करावे, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.
जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी बोलताना म्हणाले, या न्यायालयामुळे ग्राहकांना न्याय मिळण्यासाठी सहज सुविधा उपलब्ध होतील. न्यायासाठी बंगळुरूस जाण्याची गरज भासू नये, यासाठी संचार न्यायालय कार्यान्वित करण्यात आले आहे. या कार्यालयासाठी आवश्यक सर्व सुविधा, कर्मचाऱ्यांची नेमणूक आणि इतर सुविधा लवकरच पुरविण्यात येणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार जगदीश शेट्टर, विधान परिषदेचे सदस्य हनुमंत निराणी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष संजीव कुलकर्णी, बेळगाव जिल्हा ग्राहक आयोगाचे अतिरिक्त पीठ अध्यक्ष महांतेश शिग्गी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.