Wednesday, February 5, 2025

/

तिरुपती देवस्थानाच्या धर्तीवर ‘यल्लम्मा’चा विकास!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : तिरुपती तिरुमला देवस्थानम (टीटीडी) च्या धर्तीवर सौंदत्ती तालुक्यातील यल्लम्मा डोंगरावरील श्री क्षेत्र रेणुकादेवी देवस्थानचा व्यापक विकास करण्यासाठी एक योजना तयार केली जाईल, या अंतर्गत याठिकाणी येणाऱ्या भाविकांना भरघोस सुविधा पुरविण्यात येतील, असे आश्वासन पर्यटन विकास मंत्री एच. के. पाटील यांनी दिले. बेळगावमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सौंदत्ती यल्लम्मा डोंगर परिसरातील विकासकामांबाबत माहिती दिली. तसेच पर्यटन विकासासंबंधी देखील विविध योजनांची माहिती दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, या वर्षी माघ पौर्णिमेच्या निमित्ताने सौंदत्ती यल्लम्मा डोंगर परिसरात जिल्हा प्रशासनाने गर्दी व्यवस्थापन, पार्किंग, शौचालये, एलईडी स्क्रीन बसवणे यासह विविध सुविधा सुरू केल्या आहेत. दासोह भवन म्हणजेच अन्नछत्रच्या निर्मितीसाठी एक महिन्यात भूमिपूजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच तिरुपतीच्या धर्तीवर सौंदत्ती डोंगराचा विकास करण्याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. यासोबतच सौंदत्ती विकास मंडळाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला असून जिल्हा प्रशासनाने काही किरकोळ कायदेशीर अडचणी सोडविल्या आहेत.

माघ पौर्णिमेनिमित्त १२ तारखेला संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून १०० कोटी रुपये आणि प्रसाद योजनेंतर्गत २० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. याशिवाय राज्य सरकारकडूनही भरीव अनुदान देण्यात आले आहे. वसतिगृह, दासोह भवन आणि पायाभूत सुविधांसह मास्टर प्लॅन जवळपास अंतिम टप्प्यात असून लवकरच वेबसाईटवर जनतेच्या माहितीकरिता सर्व मजकूर प्रकाशित केला जाणार आहे. दासोह भवन उभारल्यानंतर तेथे दासोह म्हणजेच अन्नछत्र सुरू केले जाईल. तसेच सौंदत्ती डोंगर परिसरात खुल्या शौचालयाच्या समस्येवर गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत, असे ते म्हणाले.Hk  patil

मंत्री एच. के. पाटील पुढे म्हणाले, तसेच, डिसेंबर २६ आणि जानेवारी २१ रोजी ‘गांधी भारत’ कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला असून सरकारच्या वतीने सर्व संबंधितांचे आभार मानण्यात आले. ‘गांधी भारत’ कार्यक्रम ऑक्टोबर २ पर्यंत सुरू राहणार असून सरकारच्या वतीने २८ प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. गोकाक धबधब्याच्या परिसरात रोप वे प्रकल्प हाती घेण्यात आला असून, भिमगड भागात १८ कि.मी. पर्यंत जंगल सफारी सुरू करण्याची तयारी सुरू आहे. ही सफारी सुरू झाल्यानंतर भिमगड एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाईल.

या पत्रकार परिषदेदरम्यान मंत्री एच. के. पाटील यांनी पर्यटनविषयक माहिती पुस्तिकेचे प्रकाशन केले. यावेळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद, गीता कौलगी, पर्यटन खात्याच्या संचालक सौम्या बापट आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.