बेळगाव लाईव्ह :कोणतीही गुन्ह्याची घटना, दंगा -भांडण अथवा कोणत्याही दिवाणी प्रकरणात मध्यस्थी करण्यास जाऊन लोकांना घाबरवणे वगैरे प्रकार रावडी शिटरनी करू नयेत. अन्यथा गय केली जाणार नाही, त्याचे अतिशय गंभीर परिणाम होतील, असा सक्त इशारा बेळगाव शहराचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी शहरातील रावडी शिटर्सना दिला.
शहर परिसरातील गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रावडी शिटर्सची आज गुरुवारी ओळख परेड घेण्यात आली. त्यावेळी त्यांना उद्देशून पोलीस उपायुक्त जगदीश बोलत होते. ते म्हणाले की, या ठिकाणी तुम्हा सर्वांना कोणत्या सभासमारंभ कार्यक्रमाला बोलावलेले नाही. तुम्ही समाजातील मोठ्या व्यक्ती देखील नाही. तुम्ही रावडी शिटर आहात. त्यामुळे पोलिसांचे तुमच्यावर कायम लक्ष असते.
त्या अनुषंगाने वेळोवेळी तुमची झडती घेतली जाते. तुम्ही दररोज काय काम करता? कुठे जाता? कोणाच्या संपर्कात असता? थोडक्यात तुमच्या दैनंदिनीवर आम्हा पोलिसांचे बारीक लक्ष असते. पोलीस खात्यातर्फे मी तुम्हाला कठोरपणे सांगतो की, तुमचा स्वभाव, वर्तन, तुमचे काम वगैरे गोष्टी कोणत्याही कारणास्तव समाजविरोधी असू नयेत.
कोणतीही गुन्ह्याची घटना असू दे, दंगा -भांडण असू दे अथवा कोणत्याही दिवाणी प्रकरणात मध्यस्थी करण्यास जाऊन लोकांना घाबरवणे वगैरे प्रकार केल्यास चांगले होणार नाही. सर्व अधिकारी पोलिसांना सूचना देऊन ठेवण्यात आल्या आहेत जर अशा प्रकरणात तुम्ही कोणी आढळून आलात तर त्याचे परिणाम अतिशय गंभीर होतील. तुम्ही तुमचे रोजचे काम करा घरी जा, जेवण करा आणि घरात गप्प बसा. ते सोडून मी हे करतो, ते करतो, धमकी देतो, मी मोठा डॉन आहे, अशा अविर्भावात राहाल तर ते येथे खपवून घेतले जाणार नाही.
कोणाचीही गय केली जाणार नाही. तुम्ही जर कोणत्या गुन्ह्याच्या प्रकरणात दहा वर्षापासून अडकले असाल तर तुमचे सुधारलेले वर्तन पाहून रावडी सीटर यादीत तुमचे नांव ठेवायचे की नाही याचा पुनर्विचार करण्याचा प्रयत्न केला जाईल. अन्यथा मोठेपणा मिरवत मी घाबरत नाही, लहान -मोठी भांडण करून मी आरामात पोलीस स्टेशनला जाऊन येतो अशी वृत्ती बाळगा तर आम्ही गप्प बसणार नाही, असा सक्त इशारा शहर पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिला.