बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील रुग्णांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कर्नाटक खाजगी वैद्यकीय प्रतिष्ठान कायदा 2007 या कायद्याची अंमलबजावणी व्हावी. याकरिता नियुक्त बेळगाव जिल्हा नोंदणीकरण आणि तक्रार निवारण समिती कार्यान्वित केली जावी, अशी मागणी अभिजन भारत असोसिएट्स या संस्थेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
सदर मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी अभिजन भारत असोसिएट्सचे व्यवस्थापकीय विश्वस्त ॲड. एम. व्ही. अर्थात माधवराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
निवेदनाचा स्वीकार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी मागणी संदर्भात त्वरेने निर्णय घेऊन कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले. सदर निवेदनाची प्रत नोंदणी आणि तक्रार निवारण प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकाऱ्यांना देखील सादर करण्यात आली आहे.
आपल्या मागणी संदर्भात बेळगाव लाईव्हशी बोलताना ॲड. माधवराव चव्हाण यांनी सांगितले की, अभिजन भारत असोसिएट्स ही बेळगाव शहरातील एक सेवाभावी संस्था असून या संस्थेच्या विविध विभागांपैकी ‘वेणूग्राम आरोग्यम्’ हा एक विभाग आहे. हा विभाग बेळगाव शहरातील आरोग्य क्षेत्राच्या बाबतीत रुग्णांच्या ज्या विविध तक्रारी आहेत त्यांचे निवारण करण्यासाठी प्रयत्नशील असतो त्या अनुषंगानेच आज आम्ही राज्यामध्ये किमान बेळगाव जिल्ह्यात कर्नाटक खाजगी वैद्यकीय प्रतिष्ठान कायदा 2007 च्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.
कारण सदर कायदा रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील नाते हाताळणारा महत्त्वाचा कायदा आहे. या कायद्याअंतर्गत रुग्ण व डॉक्टर यांच्यातील समस्या हाताळल्या जातात यासाठी प्रत्येक जिल्ह्याकरिता नोंदणीकरण आणि तक्रार निवारण समिती नियुक्त करण्यात आली आहे या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आणि सेक्रेटरी हे जिल्हा आरोग्य अधिकारी असतात. तथापि संबंधित कायद्याच्या आधारे या समितीकडून आजतागायत कोणतीच कारवाई झालेली नाही. तेंव्हा बेळगाव जिल्ह्याची नोंदणीकरण आणि तक्रार निवारण समिती कार्यानित करावी अशी आमची मागणी आहे.
ज्यामुळे बेळगाव शहरासह जिल्ह्यातील रुग्णांच्या तक्रारींचे निवारण होऊन त्यांना दिलासा मिळू शकेल, अशी आमची अपेक्षा आहे, ॲड. चव्हाण म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करतेवेळी अभिजन भारत असोसिएट्स संस्थेचे अन्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.