बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या वाढलेल्या रहदारीला शिस्त आणि सुरळीत वाहतूक करण्यासाठी वाहतूक विभागाकडून अनेक उपक्रम राबविले जात आहेत. मात्र दुसरीकडे रस्त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य आणि अनेक ठिकाणी ठप्प झालेली सिग्नल यंत्रणा यामुळे अपघातांना आमंत्रण मिळत आहे.
शहापूर येथील बँक ऑफ इंडिया कॉर्नर, यंदे खूट, एपीएमसी, आझम नगर यासह अनेक ठिकाणच्या सिग्नल यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. शहरातील शहापूर येथील बँक ऑफ इंडिया कॉर्नर नजीकच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने येथे वारंवार किरकोळ अपघात घडत आहेत.
तर यंदे खूट नजीकचा सिग्नल कोसळून ६ महिने उलटूनही अद्याप येथील सिग्नल यंत्रणा सुरळीत करण्यात न आल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी, वाहनधारकांची कसरत वाढली असून हे चौक धोकादायक बनले आहेत.
शहरातील मुख्य प्रवेशद्वार असलेल्या, महत्वाच्या चौकांपैकी एक असणाऱ्या यंदे खूट मार्गे चंदगड, कोंकण, गोवा यासह बेळगाव शहर, उपनगर, तालुक्यातील विविध गावातील नागरिक बेळगावला येतात. उपरोक्त भागातील नागरिकांसाठी बाजारपेठेला जोडणाऱ्या या मार्गावरील सिग्नल जुलै २०२४ मध्ये मोडकळीस आला होता. मात्र सदर सिग्नल अद्याप उभारण्यात न आल्याने या चौकातील वाहतुकीच्या समस्येमध्ये वाढ होत आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेला जोडणाऱ्या या चौकातून दररोज हजारो वाहनांची वर्दळ होते. चन्नम्मा चौकातून धर्मवीर संभाजी चौक मार्गे पुढील उपनगरांच्या दिशेने तसेच धर्मवीर संभाजी चौक मार्गे चन्नम्मा चौकाच्या दिशेने जाणारी असंख्य वाहने, चंदगड भागातून मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दाखल होणारी वाहने, याच परिसरात असलेल्या शाळा – महाविद्यालयासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहतूक यासह शहरातील प्रमुख चौक असल्याने मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखला जाणारा हा चौक सध्या सिग्नल यंत्रणेविना धोकादायक ठरला आहे. या भागात अनेकवेळा रहदारी पोलीस हजर असतात. मात्र बहुसंख्यवेळा या पोलिसांचे वाहतूक नियंत्रणात दुर्लक्षच झालेले दिसून येत असून परिणामी अनेकवेळा वाहतूक कोंडी, अपघात यांचे प्रमाण वाढत चालले आहे.
दुसरीकडे शहापूर येथील सिग्नल यंत्रणाही ठप्प झाल्याने या भागातून मार्गस्थ होणाऱ्या वाहनचालकांना याचा फटका बसत आहे. महात्मा फुले रोड, एस. पी. एम. रोड, पी. बी. रोड, शहापूर बाजारपेठ अशा रस्त्यांना जोडणारा सिग्नल नादुरुस्त झाल्याने अनेक किरकोळ अपघात घडत आहेत. या चौकात रहदारी पोलीस देखील तैनात नसल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. परिणामी सकाळी आणि सायंकाळी वाहनधारकांना रस्ता पार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
रहदारी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अशा भागात दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. येथील सिग्नलच बंद असल्याने मनमानीप्रमाणे वाहने चालविली जात आहेत. वाहनधारकांना शिस्त लावण्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. पोलीस प्रशासनाचे नवीन सिग्नल उभे करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही समस्या निर्माण होऊ लागली आहे. सिग्नल उभारण्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे का? असा प्रश्नही पडू लागला आहे. या मार्गावरून अवजड वाहनांसह लहान-सहान वाहनांची संख्याही मोठी आहे. मात्र सिग्नलअभावी हा मार्ग धोकादायक बनू लागला असून तातडीने सिग्नल यंत्रणा बंद पडलेल्या चौकात सिग्नल यंत्रणा उभारण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.