बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेत सध्या अधिकार्यांमध्ये तणाव निर्माण झाला असून, केवळ चारच दिवसांत 40 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आल्याने मनपा आयुक्त शुभा यांच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात आज पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, बेळगाव महानगरपालिकेत काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदली करण्यात आल्या असून यासंदर्भातील वृत्त आपल्या कानी पडले आहे. बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्त देखील करून घेतले जात आहे.
याबाबत सदर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनेने आपल्याला निवेदन दिले असून यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे. चर्चेअंती याबाबत माहिती मिळेल, असे ते म्हणाले.
बेळगाव महापालिकेत सध्या अधिकार्यांमध्ये तणाव निर्माण झाला असून, चार दिवसांतच 40 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आल्यामुळे आयुक्त शुभा यांनी कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतले आहेत का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहे.
या बदल्यांमुळे अस्वस्थ झालेल्या कर्मचाऱ्यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन आयुक्त शुभा यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मनपा आयुक्त बी. शुभा मनमानी पद्धतीने कारभार करत असून, कर्मचाऱ्यांवर मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, प्रशासनाच्या दृष्टीनेच या बदल्या केल्याचा दावा आयुक्त शुभा यांनी केला आहे. मात्र, संतप्त कर्मचाऱ्यांनी शुभा यांच्या बदल्या करण्यासाठी आग्रह धरला आहे. सध्या केएमएस संवर्गातील अधिकाऱ्याची बेळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तब्बल 6 लाख लोकसंख्या असलेल्या बेळगाव महापालिकेत प्रथमच केएमएस संवर्गातील अधिकारी आयुक्त म्हणून रुजू झाले आहेत.
बेळगाव महापालिकेसाठी आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी मंत्रीमहोदयांकडे करण्यात आली आहे. या घडामोडींमुळे महापालिकेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे.