Sunday, February 16, 2025

/

आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेसमोर नवे संकट

 belgaum

बेळगाव लाईव्ह : स्मार्ट सिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या विकासकामांतर्गत शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पी. बी. रोड येथील वादग्रस्त रस्ता बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयाने विस्थापितांना नुकसान भरपाई दाखल २० कोटी रुपये रुपये देण्याचे आदेश बजावले.

बेळगाव महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट वाढत असतानाच बेळगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल देत साई मंदिर रोडवरील दुकान संकुलाच्या कंत्राटदाराला ७० लाख रुपये थकबाकी देण्याचा आदेश बजावला आहे.

गेली १२ वर्षे थकीत असलेल्या या रकमेबाबत कंत्राटदाराने अखेर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. आता कोर्टाच्या निकालामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेवर आणखी बोजा वाढला आहे. २०११ साली बेळगावमध्ये जागतिक कन्नड संमेलन झाले होते.

या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली होती. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठा आक्रोश निर्माण झाला होता. त्यावेळी आयोजित बैठकीत दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी व्यापाऱ्यांना नव्या दुकानांच्या उभारणीचे आश्वासन दिले होते.

या आश्वासनानुसार साई मंदिर रोडवर एक व्यावसायिक संकुल उभारण्यात आले. या प्रकल्पासाठी ५० टक्के निधी आमदार निधीतून आणि उर्वरित ५० टक्के निधी महापालिकेकडून खर्च करण्यात आला. मात्र, दुकानांचे वाटप आणि व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर वाद निर्माण झाला. काही दुकाने वितरित झाली असली, तरी अनेक दुकाने रिक्त राहिली, आणि हा विषय हळूहळू विस्मरणात गेला.

दरम्यान, दुकान संकुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला पूर्ण पैसे मिळाले नाहीत. अनेक वर्षे थकीत रक्कम मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मात्र, महापालिकेकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी कोर्टात धाव घेतली. आता न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला असून, महापालिकेला ७० लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे.

या निर्णयामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या बेळगाव महापालिकेसमोर नवे संकट उभे राहिले आहे. ही रक्कम कशी आणि कुठून उभी केली जाणार, तसेच याचा शहराच्या विकासकामांवर कितपत परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.