बेळगाव लाईव्ह :कचरा, गटारी वगैरे नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या बेळगाव महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी आता शहरातील स्मशानभूमी व्यवस्थेकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आयुक्तांनी आज शुक्रवारी सकाळी अनगोळ स्मशानभूमीला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या.
अनगोळ स्मशानभूमीला दिलेल्या भेटी प्रसंगी महापालिका शुभा बी. यांनी स्मशानभूमीची संपूर्ण पाहणी करून तेथील समस्या जाणून घेतल्या.
याप्रसंगी त्यांच्या समवेत आरोग्य अधीकारी हणमंत कलादगी, मुतेन्नावर, स्वच्छता निरीक्षक प्रवीण कुमार, अनिल बोरगावी, महसूल अधिकारी गुंडापन्नावर आदींसह माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, सामाजिक कार्यकर्ते अजित पाटील व इतर उपस्थित होते.
यावेळी गुंजटकर व पाटील यांनी अनगोळ स्मशानात रजिस्टर नोंदणी होत नाही, येथे वॉचमन नाही, महिलासाठी टॉयलेटची सोय नाही, अंत्यसंस्काराच्या शेड वरील पत्रे खराब झाले आहेत. स्मशानभूमीची स्वच्छता राखली जात नाही वगैरे तक्रारी मांडून त्यामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाची माहिती मनपा आयुक्तांना दिली. त्याची गांभीर्याने दखल घेऊन आयुक्त शुभा बी. उपस्थित अधिकाऱ्यांना स्मशानभूमी तात्काळ आजपासून दिवस-रात्र वॉचमनची नियुक्ती करण्याचा आदेश दिला.
त्याचप्रमाणे स्मशानभूमीतील अन्य समस्यांचे निवारण करण्याच्या सूचना केल्या. अनगोळ स्मशानभूमीत अंत्यसंस्कारावेळी अग्नी दिल्यानंतर रजिस्टर नोंदणीची व्यवस्था नसल्यामुळे दुःखात असलेल्या लोकांना सतत महापालिकेकडे हेलपाटे मारावे लागत होते. मात्र आता स्मशानात नोंदणी रजिस्टरसह वॉचमनची नियुक्ती होणार असल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.