बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील चलवेनहट्टी गावातील देवस्थानच्या जागेच्या मुद्द्यावरून आज येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत याप्रकरणी लक्ष घालून न्याय देण्याची मागणी केली.
चलवेनहट्टी ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले असून या निवेदनात ब्रह्मलिंग देवस्थानच्या सुमारे १३.५ एकर जागेवर अतिक्रमण करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
सदर जागा हि चलवेनहट्टी देवस्थान कमिटीची असून गेल्या सहा महिन्यांपासून सदर जागा विक्री करणे, जागेवर घर बांधणे असे प्रकार सुरु आहेत. यासंदर्भात ग्रामस्थांची बैठक घेऊन अनेकवेळा विनंती करण्यात आली. मात्र अद्याप असे प्रकार सुरु असून जागा हडप करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सदर जागा जी खुली असणे गरजेचे असून गावातील इतर ठिकाणी असलेली पिकाऊ जमीनदेखील ग्रामस्थांच्यावतीने कसण्यात येत आहे.
सदर जमिनीवर घेतलेल्या पिकातून मिळणार मोबदला हा देवस्थान कमिटीला देणे रास्त आहे. शिवाय या पिकाऊ जमिनी कसण्यासाठी ग्रामस्थांना हक्क देणे गरजेचे आहे, शिवाय इतर जागा या खुल्या असणे गरजेचे आहे. मात्र तसे न करता सदर जागांची परस्पर विक्री करून जागा हडप करण्याचे प्रकार सुरु आहेत.
असाच प्रकार कंग्राळी बुद्रुक व्याप्तीतील गौंडवाड गावात घडला. या वादातून तेथील कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणाबाहेर गेली.
गौंडवाडमध्ये घडलेल्या प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष द्यावे, आणि हा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी चलवेनहट्टी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.