बेळगाव लाईव्ह: नवी दिल्ली येथे झालेल्या 98 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात सीमा प्रश्नाचा ठराव संमत करावा अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने साहित्य संमेलन अध्यक्ष तारा भवाळकर यांच्याकडे केली होती, त्याची दखल घेत अध्यक्षांनी आपल्या भाषणात याचा उल्लेख केला होता .आता या संमेलनाच्या समारोपात सीमा प्रश्नाचा ठराव देखील मांडण्यात आला आहे.
साहित्य संमेलन समितीच्या वतीने सूचक प्रा. मिलिंद जोशी यांनी सीमा प्रश्नाचा ठराव मांडला तर गुलबर्गा येथील प्रा. गुरय्या स्वामी यांनी ठरावाला अनुमोदन दिले.
नेमका कसा मांडला ठराव?
गेली 68 वर्षे महाराष्ट्र सीमेवरील 865 गावातील सुमारे 25 ते 30 लाख मराठी भाषिक महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहेत. तसेच वीस वर्षापासून माननीय सर्वोच्च न्यायालयात यासंबंधी दावा प्रलंबित आहे ही एक प्रकारे लोकशाहीची थट्टाच आहे, तेव्हा खेडेघटक, भौगोलिक सलगता, सापेक्ष बहुभाषिकता व लोकेच्छा या सर्वमान्य/ जगमान्य तत्त्वाचा अवलंब करून हा वादग्रस्त सीमाभाग केंद्रशासनाने तत्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा अशी मागणी हे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करत आहे.
2003 साली बेळगावात य दि फडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या साहित्य संमेलनात बेळगाव सीमाप्रश्न सुप्रीम कोर्टात घालावा आणि सुप्रीम कोर्टातून सीमाभागांला न्याय मिळेल असा ठराव करण्यात आला होता. त्यानुसार 2004 साली सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र शासनाने खटला दाखल केला. आता जवळपास 20 वर्षांनी दिल्लीत ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर यांच्या अध्यक्षतेखाली 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सीमा प्रश्न सोडवावा असा ठराव मांडण्यात आला आहे.
दिल्ली दरबारात मराठीचा जागर होत असताना मराठी भाषेवर असणारी ही भळभळती जखम कायमची बरी व्हावी या उद्देशाने अखिल भारतीय साहित्य संमेलनात हा ठराव करून आपली मागणी मराठी माणसाने नेटाने दिल्लीत लावून धरली आहे. मेहेरचंद महाजन यांच्या अन्यायी अहवालानुसार मराठी बहुभाषिक भाग कर्नाटकात डांबण्यात आला परंतु मराठी माणसाने ही सक्ती नाकारत गेली 68 वर्षे आपला लढा निकराने चालू ठेवला आहे.
मराठी भाषेची गळचेपी कदापीहीं खपवून घेणार नाही या भावनेतून सातत्याने लढा देत असणाऱ्या मराठी माणसाची भावनाच साहित्य संमेलनाच्या ठरावाच्या रूपाने दिल्लीत घुमली आणि या साहित्य संमेलनाचे उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी होते यामुळे तत्वत:मराठी माणसाचा एक प्रकारे विजयच आहे अशी मराठी माणसाची भावना आहे