बेळगाव लाईव्ह : बेळगाव ग्रामीण पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणाचा छडा लावत चार आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेल्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी आनंद जयवंत चौगुले ( राहणार शिवाजी चौक, खादरवाडी, बेळगाव) यांनी बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात पिरनवाडी गावातील भाजी मार्केटजवळ दुकानासमोर त्यांनी लॉक न करता ठेवलेली त्यांची हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस दुचाकी (क्रमांक – केए २२/ईजी ७३९३) चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली होती.
या तक्रारीवरून बेळगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३६/२०२५ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता. या तक्रारीच्या आधारे सुरु असलेल्या तपासादरम्यान पोलिसांनी १५ फेब्रुवारी २०२५ रोजी चार आरोपींना अटक केली असून चौकशीत आरोपींनी मिळून सहा दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून अंदाजे २.२५ लाख रुपये किमतीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
याप्रकरणी मलीकजान उर्फ बाब्या फारूक बुडण्णावर, अफ्ताब उर्फ अप्या मोहम्मद हनीफ अत्तार, सैफ अली उर्फ चकोल्या गौस मोदिन कालकुंद्री, अन्सार उर्फ ब्लॅकडॉन बाबाजान खाजी सर्व राहणार पिरनवाडी, बेळगाव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
सदर आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. पोलिस आयुक्तांनी या प्रकरणाचा छडा लावणाऱ्या पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
पोलिस आयुक्त, उपआयुक्त (कायदा व सुव्यवस्था), उपआयुक्त (गुन्हे व वाहतूक) तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त, ग्रामीण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पी.एस.आय. एल.एस. जोडट्टी, पी.एस.आय. आदित्य राजन, पी.एस.आय. श्रीमती श्वेता आणि कर्मचारी एम.बी. कोटबागी, श्रीकांत उप्पार, महेश नायक, आनंद कोटगी यांचा समावेश होता.