बेळगाव लाईव्ह : कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दड्डी-मोहनगा येथील श्री भावेश्वरी देवीच्या यात्रेला गुरुवार दि. १३ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक यात्रा परिसरात दाखल झाले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी भावकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटी, सलामवाडी ग्रामपंचायत तसेच यात्रा कमिटीच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली असून यात्रा परिसर गर्दीने फुलला आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर हुक्केरी तालुक्यात असलेल्या ताम्रपर्णी नदीकाठी वसलेल्या मोहनगा येथील श्री भावेश्वरी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दाखल होतात. सुमारे २०० ते ३०० वर्षांचा इतिहास असलेल्या या यात्रेचे महत्व आजही मोठे आहे. माघी पौर्णिमेच्या दिवशी भरणाऱ्या या यात्रेसाठी कर्नाटकासह महाराष्ट्र आणि गोव्यातील भाविक देखील मोठ्या संख्येने दाखल होतात.
याठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेत भावकाई देवी पाटील ट्रस्ट कमिटी, सलामवाडी ग्रामपंचायत तसेच यात्रा कमिटीच्यावतीने दर्शन रांग, वाहने पार्किंग, पाणी, शौचालये, स्वच्छता गृहे, पथदीप, वीजपुरवठा तसेच विविध विकासकामे राबविली असून यासंदर्भात देवस्थान समितीच्या वतीने ग्रामपंचायत आणि शासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती.
पूर्वतयारी बैठकीत भाविकांच्या सोयीच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेतल्यानंतर त्याचपद्धतीने भाविकांना यंदा सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रा काळात भाविकांनी देखील सहकार्य करावे असे भावेश्वरी देवस्थान समितीचे जनार्दन जयराम पाटील आणि भाऊराव पाटील यांनी आवाहन केले.
शस्त्र इंगळ्याचा कार्यक्रम, देवीला दंडवत व महानैवेद्याचा कार्यक्रम, पालखी मिरवणूक असे या यात्रेचे स्वरूप असते. मंदिर आवारात पूजेचे साहित्य तसेच खेळणी आणि इतर साहित्याची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली असून मनोरंजनात्मक खेळ देखील दाखल झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे परिवहन मंडळाच्यावतीने भाविकांसाठी विशेष बसची सोय करण्यात आली आहे. ग्रामपंचायतिच्यावतीने पिण्याच्या पाण्याची सोय, वैद्यकीय सेवा सुरळीत करण्यात आली असून आहे. यात्राकाळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे.
मंदिर परिसरासहित मंदिराच्या आतील बाजूस स्वयंसेवक आणि पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आले आहेत. यात्रा परिसर गर्दीने फुलून आला असून पालखी मिरवणुकीने यात्रेची सांगता होणार आहे.