बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर व ग्रामीण भागात वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद झाली असून वाहन चोरी, घरफोडी आणि अपघाताच्या घटनांनी नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. पोलिसांनी या प्रकरणांची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माळमारुती पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार 18 जानेवारी 2025 रोजी अज्ञात चोरट्यांनी अॅशोक नगर, बेळगाव येथून 35,000 रुपये किमतीची जुपिटर दुचाकी (केए-22/ईझेड-0185) चोरून नेली. या प्रकरणी 14 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यानुसार 13 फेब्रुवारी 2025 रोजी खादरवाडी येथील एका घरफोडीच्या घटनेत चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यांनी घरातील 15 ग्रॅम सोन्याचा नेकलेस (मूल्य 67,500 रुपये), 5 ग्रॅम सोन्याची अंगठी (मूल्य 22,500 रुपये) आणि 22,000 रुपये रोख रक्कम असा मिळून एकूण 1,12,000 रुपयांचा ऐवज लंपास केला.
दरम्यान, बेळगाव दक्षिण वाहतूक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 12 फेब्रुवारी 2025 रोजी एका अपघाताची नोंद झाली असून आरोपी विजय प्रकाश हेगडे, (रा. क्रांतीनगर, गणेशपूर, बेळगाव) हा आपल्या केए-22-एए-3043 या क्रमांकाच्या ऑटोरिक्षातून भरधाव वेगाने जात असताना त्याने महादेव बाळू खंडागळे (वय 67) यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर आरोपीने भरधाव वेगात पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या शिवराज धीरज अटकरेकर (वय 12) यास धडक दिली. यात त्याला चेहरा, डावा हात आणि दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी बेळगाव दक्षिण वाहतूक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदर घटनांबाबत पोलीस अधिक तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. शहर आणि ग्रामीण भागात वाढत्या गुन्ह्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.