बेळगाव लाईव्ह :प्रयागराज येथील कुंभमेळ्या गेलेल्या मध्य प्रदेश मधील जबलपूर जिल्ह्यामध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजक तोडून पलीकडच्या रस्त्यावर गेलेल्या भरधाव कारला बसची धडक बसल्याने घडलेल्या भीषण अपघातात बेळगाव जिल्ह्यातील 6 जण जागीच ठार तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. धडक इतकी जबरदस्त होती की कारचे टप संपूर्णपणे उध्वस्त झाले होते.
अपघातात ठार झालेल्या दुर्दैवी प्रवाशांमध्ये भालचंद्र नारायण गौडर (वय 50, रा. लक्ष्मी बडवणे गोकाक, सुनील बाळकृष्ण शेडशाळ (वय 45, रा. हत्तरकी -आनंदपुर गोकाक), बसवराज निरपादप्पा कुर्ती (वय 63, रा. गोंबगुडी गोकाक), बसवराज शिवाप्पा दोडमणी (वय 49, रा. गुरुवार पेठ गोकाक), इराण्णा शंकराप्पा शेबिनकट्टी (वय 27, रा. कमतगी गुळेदगुड्ड) आणि वीरूपाक्ष चन्नाप्पा गुमती(वय 61, गुरुवार पेठ गोकाक) अशी आहेत.
गंभीर जखमींमध्ये मुस्ताक (सिंधी कुरबेट) व सदाशिव केदारी (उपलाळी) यांचा समावेश आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, गोकाक तालुक्यातील काही भाविक प्रयागराज येथील कुंभमेळ्यात सहभागी होऊन कार गाडीने (क्र. केए 49 ऐम 5054) माघारी परतत होते. त्यावेळी जबलपूर जिल्ह्यातील सिहोरा येथे खितौला पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजक तोडून पलीकडच्या चुकीच्या रस्त्यावर गेली आणि तिने समोरून येणाऱ्या बसला (क्र. एमएच 40 सीएम 4579) धडक दिली.
तुफान वेगात असलेल्या कारची धडक इतकी जबरदस्त होती की तिच्या टपाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या. परिणामी कार मधील 6 जण जागीच ठार झाले त्याचप्रमाणे दोघेजण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींना प्रथम सिहोरा हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी जबलपूर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
अपघात इतका भीषण होता की घटनास्थळी रक्ताचा सडा पडण्याबरोबरच कारमधील प्रवाशांचे साहित्य रस्त्यावर इतस्ततः विखरून पडले होते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य हाती घेतले.
अपघात घडताच बस चालकाने बससह घटनास्थळावरून पोबारा केला, ज्याला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी स्थानिक खितौला पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.