बेळगाव लाईव्ह विशेष : जैसे हरळांमाजी रत्नकिळा । कि रत्नांमाजि हिरा निळा । तैसी भाषांमाजी चोखळा । भाषा मराठी ।। मराठी भाषा समृद्ध आहे. मराठी भाषेत शब्दांची ताकद आहे. मराठी प्रमाणभाषेप्रमाणे बोलीभाषाही समृद्ध आहे. बदलत्या भागांनुसार बोलीभाषाही बदलत जाते. प्रत्येक बारा कोसावर बोलीभाषा बदलते. मराठी बोलीभाषेची एक वेगळी खासियतच म्हणावी लागेल. बेळगावच्या बोलीभाषेतही एक विशिष्ट गोडवा आहे.
बेळगावमधील ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी वेगळ्या ढंगाची वेगळी बोली भाषा बोलली जाते. बेळगाव मधील बोलीभाषा ही कन्नड, चंदगडी, कोल्हापुरी, कोकणी अशा अनेक बोलींच्या मिश्रणातून तयार झालेली आहे. याच बोलीभाषा आज इंस्टाग्रामसह विविध सोशल मीडियावरील रीलस्टार्सच्या माध्यमातून जपली जात आहे आणि त्या भाषेचे संवर्धनही केले जात आहे. आज मराठी भाषा दिन आणि ‘बेळगाव लाईव्ह’च्या वर्धापन दिनानिमित्त बेळगावमधील रील स्टार्स सोबत संवाद साधून आपल्या बेळगावच्या विशेष बोलीभाषेतील प्रवासाचा ‘बेळगाव लाईव्ह’ने घेतलेला आढावा….
*विशेष डायलॉग आणि अंगावर सोनसाखळ्या मिरवणारे : गोल्डन अंकल : महेश खटावकर*
‘… लावा ताकद, विषय संपला’, ‘बघतोस काय रागानं’, या डायलॉगने सध्या बेळगाव परिसरात धुमाकूळ घातला आहे. फेसबुक, ट्विटर, स्नॅपचॅट यापेक्षाही रील साठी सरसभर पुढे असणाऱ्या इंस्टाग्रामवरील बेळगावचे ‘गोल्डन अंकल’ अर्थात महेश खटावकर यांनी आपल्या विशेष शैलीच्या डायलॉगबाजीतून तरुणाईसह प्रत्येकालाच वेड लावले आहे. अंगावर सोनसाखळ्या मिरवण्याची हौस असणाऱ्या महेश खटावकर यांना गोल्डन अंकल हि उपाधी त्यांच्या याच पेहरावामुळे पडली. सायकलवरून नेहमी प्रवास करणारे गोल्डन अंकल हे बेळगाव शहरात वास्तव्यास आहेत. कुठेही दिसले तरी अगदी गोल्डन अंकल अशी हाक मारत गल्लीतील लहान मुलांपासून ते तरूणांपर्यंतच्या हाकेला आपल्या विशेष शैलीतून हे प्रतिसाद देतात. हेरवाडकर शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून सध्या ते कार्यरत असून उत्तम चित्रकार, रांगोळी कलाकार, मेहंदी कलाकार म्हणून ते परिचित आहेत. याव्यतिरिक्त आधार कार्ड, पॅन कार्ड यासारख्या कागदपत्रांचे ऑनलाईन कामकाजदेखील ते करून देतात.
गेल्या ३ वर्षांपासून इंस्टावर त्यांचा प्रवास सुरु झाला असून त्यांचे तब्बल 40000 फॉलोअर्स आहेत. वाढदिवस, लग्नकार्य, शुभारंभ, उद्घाटन अशा अनेक कार्यक्रमात सध्या ते आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. इंस्टाच्या माध्यमातून बेळगावच्या खास बोलीभाषेच्या शैलीतून ते रिल्स बनवत असून आपली भाषा, संस्कृती यासह सामाजिक भान राखूनच सोशल मीडियाचा वापर प्रत्येकाने करावा, असे आवाहन देखील ते करतात.
*मल्टिपर्सनॅलिटी रील स्टार : संकेत येळ्ळूरकर*
‘आपली माय मराठी इतर परदेशी भाषा शिकण्याच्या स्पर्धेत मागे पडू लागली’, बोली भाषा बोलताना अनेक मराठी भाषिकांना संकोच वाटतो, बोली भाषा ऐकताना कित्येकजण इतरांची खिल्ली उडवतात.. मात्र एकमेकांशी थेट आणि मनापर्यंत भिडणारा संवाद हवा असेल तर आपली बोली भाषा जपणे अत्यंत महत्वाचे आहे. आपली बोलीभाषा आपले प्रतिनिधित्व करते, एकमेकांशी जोडते आणि हि खासियत बेळगावच्या ग्रामीण ढंगाच्या म्हणजेच ‘गावठी’ भाषेत आहे, असे विचार हलगा येथील संकेत रामकृष्ण येळ्ळूरकर या इन्स्टा स्टारने ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना व्यक्त केले.
२०२० पासून सुरु झालेल्या या इन्स्टा स्टारचा प्रवास मध्यंतरी थांबला. मात्र पुन्हा नव्या जोमाने संकेत येळ्ळूरकर या इन्स्टा स्टारने आपला प्रवास सुरु केला. तब्बल ६५००० फॉलोवर्स असलेल्या संकेत येळ्ळूरकरने ग्रामीण ढंगाच्या विनोदी रिल्स सुरु केल्या. ‘मल्टिपर्सनॅलिटी’ असणारा हा रील स्टार एकाचवेळी अनेक व्यक्तिरेखा साकारत आपल्या फॉलोवर्सना नेहमी हसविण्याचे काम करतो. महाविद्यालयीन पातळीपासून भुवन बाम या विनोदी कलाकाराला आपले प्रेरणास्थान मानत त्याने रील चा प्रवास सुरु केला.
इंस्टाग्रामवर दिसणारे आणि आपल्याला हसवणारे रिल्स हे दिसतात तेवढे सोपे नसतात. त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. कन्टेन्ट, शूटिंग, एडिटिंग या सर्व गोष्टींच्या मेहनतीअंती रिल्स तयार होतात, असे संकेतने सांगितले. हलगा येथील सरकारी शाळेत शालेय शिक्षण पूर्ण करून सध्या ज्योती महाविद्यालयात विज्ञान शाखेत पदवीचे शिक्षण तो घेत आहे. सोशल मीडियावर आज अनेक रिल्स प्रसारित होतात.
मात्र या माध्यमातून समाजावर चुकीचा परिणाम पडत आहे. अंगप्रदर्शन, अश्लील कन्टेन्ट यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत चुकीचा संदेश पसरत चालला आहे. हे थांबणे गरजेचे आहे. मनोरंजनासह समाजप्रबोधन होणे, सोशल मीडियाचा योग्य वापर होणे गरजेचे आहे, असे मत ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना त्याने मांडले.
*ग्रामीण शैलीतील विनोदातून समाजप्रबोधन करणारा रील स्टार : जगदीश सुतार उर्फ कार्टून जग्ग्या!*
लोकांना हसवणं हे कठीण काम आहे. आणि हसवता हसवता अंतर्मुख करणं हे त्याहूनही कठीण काम. अलीकडे सर्रास सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे लोकांमध्ये अनेक चुकीच्या समजुती पसरत चालल्या आहेत. मात्र आपल्या विनोदी शैलीतून जनजागृती आणि समाजप्रबोधन करणारा बेळगावचा रील स्टार जगदीश सुतार उर्फ कार्टून जग्ग्या! कर्ले या गावातील जगदीश सुतार उर्फ कार्टून जग्ग्या या रील स्टारला लहानपणापासून कविता, चारोळ्या आणि अनेक विषयांवरील लेखनाची आवड होती.
मात्र सोशल मीडिया किंवा प्रसिद्धी माध्यमांच्या कमतरतेमुळे हि कला दडपली गेली. पुस्तकांमध्येच लपून राहिली. मात्र हि कला आता लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रील्सच्या माध्यमातून जगदीश सुतार प्रयत्न करत आहे. गेल्या ३ वर्षांपासून सोशल मीडियावर आपल्या ग्रामीण ढंगातील विनोदी शैलीतून मनोरंजन, विनोद, शेतीकाम, शेती कामाचे महत्व, अंधश्रद्धा निर्मूलन आणि विशेष म्हणजे आपली ग्रामीण बोलीभाषा जपण्याचे कार्य रीलच्या माध्यमातून जगदीश सुतार करत आहे.
तब्बल १ लाख १० हजारच्या आसपास इन्स्टा फॉलोवर्स असलेल्या जगदीश सुतार याने कर्ले गावातच शालेय शिक्षण घेतल्यानंतर ज्योती महाविद्यालयात पदवीपूर्व शिक्षण आणि अंगडी महाविद्यालयात मेकॅनिकल इंजिनीयरिंगचे शिक्षण पूर्ण करून सध्या स्नेहम टाइपिंग सोल्युशन इंडस्ट्री येथे मेंटेनन्स सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. बेळगावच्या विशेष बोलीभाषेचा गोडवा सर्वदूर पोहोचविण्याचा मानस असलेल्या जगदीश सुतारने आपल्याला ग्रामीण ढंगाची ‘गावठी’ भाषा बोलायला आणि आपल्या भाषेचे संवर्धन करायला आपल्याला आवडते. आपल्या याच भाषाशैलीतून लोकांचे मनोरंजन करणे, प्रत्येकाला हसवत ठेवणे, विनोदाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करणे आपल्याला आवडते असे ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना सांगितले.
*बेळगावच्या खाद्यसंस्कृतीसह गावभरच्या गोष्टी सांगणारा रील स्टार : योगेश भोसले*
मित्रांसमवेत सुरु झालेला गप्पांचा प्रवास आज ३५००० फॉलोवर्स चा टप्पा गाठत ‘कॉमेडी योग्या’ या नावाने इंस्टाच्या रीलस्टार पर्यंत येऊन ठेपला आहे. गेल्या २.५ वर्षांपासून बेळगावमधील कानाकोपऱ्यातील हॉटेल, व्यवसाय, पर्यटन स्थळे, शेती यासंदर्भातील माहितीसाठी योगेश भोसले उर्फ ‘कॉमेडी योग्या’ हा रील स्टार बेळगावमध्ये प्रसिद्ध आहे.
ग्रामीण आणि बेळगावच्या विशेष भाषा शैलीत लोकांना हसविणे तसेच येथील पर्यटन स्थळे, स्थानिक व्यवसाय, खाद्यसंस्कृती यासह अनेक विषय हाताळत बेळगावची माहिती रिल्स च्या माध्यमातून योगेश भोसले सर्वदूर पोहोचवत आहे. बेळगावच्या दुर्गामाता दौडपासून इंस्टावरील सुरु झालेला प्रवास आज प्रत्येक गल्लोगल्ली सुरु आहे. इन्स्टा रिल्स बनवत के एल इ आयुर्वेदिक रुग्णालयात इलेक्ट्रिकल इन्चार्ज म्हणून काम करणाऱ्या योगेश भोसलेला स्थानिक व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे वाटते.
‘वोकल फॉर लोकल’ च्या माध्यमातून बेळगावच्या व्यावसायिकांचा विकास व्हावा यासाठी आपल्या दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त योगेश आपल्या मित्रांसमवेत तसेच कुटुंबियांसमवेत बेळगावमधील विविध भागातील रिल्स बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे.
आपल्या सभोवतालचा परिसर, बेळगावमधील सण, परंपरांची माहिती आणि बेळगावचे वैशिष्ट्य सर्वदूर पोहोचविण्याचा आपला मांस आहे. अलीकडे झटपट यश, पैसा मिळविण्याचा नादात तरुणाई भरकटली आहे, मात्र यशासाठी शॉर्टकट नाही त्यासाठी मेहनतीची गरज आहे, असे मत त्याने ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना व्यक्त केले.