बेळगाव लाईव्ह : प्रयागराज येथील कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत बेळगावच्या चार भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच उज्जैन येथील श्री महाकालचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला असून ट्रॅव्हलर आणि टँकर मध्ये झालेल्या भीषण अपघातात बेळगावच्या चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य १५ भाविक जखमी झाल्याचे वृत्त आहे. तसेच या अपघातात इंदोर येथील इतर दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रयागराज कुंभमेळ्याहून उज्जैन येथे महाकालचे दर्शन घेण्यासाठी बेळगावचे काही भाविक दाखल झाले होते. उज्जैन महाकालचे दर्शन घेऊन परतणाऱ्या ट्रॅव्हलर वाहनात आणि टँकर मध्ये शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास भीषण धडक झाली. हि धडक इतकी भीषण होती, कि यामध्ये घटनास्थळीच चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन बेळगावच्या भाविकांचा समावेश आहे. तर दोन इंदोर येथील भाविकांचा समावेश आहे. अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्याबेळगावच्या अन्य दोन महिला भाविकांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ज्योती प्रकाश खांडेकर (वय ६४, आनंदनगर, वडगांव बेळगाव), संगीता मेस्त्री (वय 52 रा. दत्त मंदिर जवळ, शिवाजी नगर, बेळगाव), नीता बडमंजी (वय ४६, रा. क्रांती नगर, गणेशपुर बेळगाव) आणि सागर पी शहापूरकर (वय 45 रा. होसुर बेळगाव) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. बेळगावच्या गणेशपुर भागातील एका व्यक्तीने या सहलीचे आयोजन केले होते. सदर टेम्पो ट्रॅव्हलर वाहनातून १९ जणांचा समूह प्रयागराजसाठी रवाना झाला होता. कुंभमेळ्याहून परतताना उज्जैन येथील महाकालचे दर्शन घेण्यासाठी सदर भाविक दाखल झाले. त्यांनतर बेळगावच्या दिशेनं परतीचा प्रवास करत असताना मध्यप्रदेश मुहू जवळील मानपुर भेरु घाटातील उतरणीला ट्रॅव्हलरने थांबलेल्या टँकरला जोराची धडक दिली. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांपैकी ज्योती प्रकाश खेडेकरआणि संगीता मेस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला तर नीता पाटील आणि सागर शहापूरकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
इंदूर प्रशासनाने बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि खासदार जगदीश शेट्टर यांना अपघाताबाबत ची माहिती दिली आहे. दरम्यान काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी मयताच्या नातेवाईकांची भेट घेतली आ सांत्वन केले मृतदेह बेळगावला आणण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.
दरम्यान मृतदेह बेळगावला आणण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांचे प्रयत्न सुरु असून आज सायंकाळी बेळगावहून नातलग रवाना होणार आहेत. सदर मृतदेह रविवारपर्यंत बेळगावमध्ये आणले जातील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
मागील आठवड्यात कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत बेळगावच्या चार भाविकांना जीव गमवावा लागला होता तर कुंभमेळ्याहून परतत असताना पुणे दरम्यान रेल्वेत एका भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यानंतर आज पुन्हा कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला असून यामध्ये आणखी चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे गेल्या पंधरवड्यात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या ९ वर पोहोचली आहे.