बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील कल्लोळी गावचे रहिवासी आणि भारतीय नौदलातील २४ वर्षीय जवान प्रवीण सुभाष खनगौड्रा यांनी आयएनएस राजाली या नौदल हवाई तळावर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे नौदल व संरक्षण दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवीण सुभाष खनगौड्रा हे भारतीय नौदलाच्या आयएनएस राजाली या अरक्कोनम येथील हवाई तळावर त्वरित कृती पथक (QRT) मध्ये कार्यरत होते. तीन वर्षांपूर्वी त्यांची या नौदल तळावर नियुक्ती झाली होती.
बुधवारी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास तळातील सुरक्षा कक्षाच्या स्वच्छतागृहातून गोळी झाडल्याचा आवाज आला. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या नौदल कर्मचाऱ्यांनी धाव घेतली असता प्रवीण खनगौड्रा हे जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्या डोक्याला गोळी लागली होती, यावेळी त्यांच्या जवळच त्यांची सर्व्हिस रायफल आढळली.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ नौदल अधिकारी आणि अरक्कोनम शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. डॉक्टरांनी तपासणी करून प्रवीण यांना मृत घोषित केले. त्यानंतर फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. अरक्कोनम शहर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
प्रवीण सुभाष खनगौड्रा यांच्या पार्थिवाला सरकारी तालुका रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी हलविण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांचे पार्थिव मूळगावी पाठवण्यात येणार आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.