बेळगाव लाईव्ह : शिक्षण क्षेत्रातील नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रेरित करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी त्रिवेणी सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा संस्था, उत्तूर यांच्यातर्फे ‘विशेष नवोपक्रम सन्मान पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. यंदाचा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बु. चे तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक सन्मा. रवींद्र मारुती पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे.
हा सन्मान सोहळा 9 फेब्रुवारी 2025 रोजी पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक स्मारक, बहिरेवाडी येथे संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कै. केदारी रेडेकर शिक्षण समूहाच्या अध्यक्षा व गोकूळच्या संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर असणार आहेत. तसेच ज्येष्ठ विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. जी. पी. माळी हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
संस्थेने चारित्र्य, निष्ठा आणि उपक्रमशीलता जपत भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्याचा संकल्प घेतला आहे. प्रा. श्रीकांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत निवडक शिक्षकांनी आपले नाविन्यपूर्ण उपक्रम सादर केले. यामधून आठ ते दहा शिक्षकांच्या नवोपक्रमांचे संकलन करून विशेष पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. या पुस्तकात सन्मा. रवींद्र पाटील यांचा नवोपक्रमही समाविष्ट आहे.
शिक्षण, साहित्य आणि माध्यम क्षेत्रात सक्रिय योगदान
रवींद्र पाटील हे केवळ उपक्रमशील शिक्षक नसून, ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कर्नाटक राज्याध्यक्ष आणि चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षण अधिक परिणामकारक करण्यासाठी ते सतत नव्या संकल्पनांचा अवलंब करतात. याशिवाय, सोशल मीडियावर ‘शिवसंदेश न्यूज’ चे संपादक म्हणून कार्यरत असून, समाजप्रबोधन आणि ऐतिहासिक वारसा जपण्याचे कार्य करत आहेत.
त्यांच्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींमुळे विद्यार्थी अधिक उत्साही आणि आत्मविश्वासपूर्ण बनतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ‘विशेष नवोपक्रम सन्मान पुरस्कार’ प्रदान केला जाणार आहे.
या सोहळ्याला शिक्षण, क्रीडा, साहित्य व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून, सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.