बेळगाव लाईव्ह : गोव्यातील फोंडा मतदार संघाचे माजी आमदार लवू मामलेदार यांची क्षुल्लक कारणावरून आज बेळगावात हत्या करण्यात आली. क्षुल्लक वादातून निर्माण झालेल्या भांडणाचे पर्यवसन हाणामारीत झाल्यानंतर लावू मामलेदार यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान हल्लेखोर हा रिक्षाचालक असल्याचे प्रसारमाध्यमांवर झळकले. मात्र सदर हल्लेखोर हा रिक्षाचालक नसून कॅब चालक आहे त्यामुळे यात रिक्षा चालकांचे नाव विनाकारण गोवण्यात येऊ नये असे आवाहन रिक्षा चालक आणि मालक असोसिएशनचे सेक्रेटरी मोहम्मद रफिक यांनी केले.
बेळगावमध्ये शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर प्रसारमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात वृत्त प्रसारित झाले. या वृत्तामध्ये रिक्षाचालकाने माजी आमदारांचा खून केल्याचे नमूद करण्यात आले आले. मात्र सदर व्यक्ती हि रिक्षाचालक नसून कॅबचालक आहे, त्याच्या कॅब वर ‘ऑटो’ असे लिहिण्यात आले आहे. मात्र त्याचा रिक्षाशी काहीही संबंध नाही.
रिक्षाचालक असे संबोधल्याने संपूर्ण रिक्षाचालकांची बदनामी होत आहे. या प्रकारावर संबंधित विभागाने कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवाय बेळगावमध्ये शहरांतर्गत १६ किलोमीटरपर्यंत कॅब चालविण्यास परवानगी नाही. यासंदर्भात पिरजादे शोरूमच्या संचालकांना बेळगावमध्ये कॅब विक्री करू नये यासाठी निवेदन देण्यात आले आहे.
घडल्या प्रकारासंदर्भात सोमवार डी. १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून बेळगावमध्ये कॅब ला बंदी घालण्यात यावी, असे आवाहन करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
सदर घटना हि क्षुल्लक वादातून सुरु झाली असून याला कोणताही जातीय रंग देण्याचे काम समाजकंटकांनी करू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.