बेळगाव लाईव्ह : अशोकनगर येथील ईएसआय रुग्णालयाचे यमनापूर येथे स्थलांतर करण्याचा आदेश २९ जानेवारी रोजी देण्यात आला होता. मात्र, आता हा आदेश तात्पुरत्या स्वरूपात निलंबित करण्यात आला आहे. कामगार मंत्र्यांच्या सचिवांनी पुढील आदेश येईपर्यंत रुग्णालय सध्याच्या ठिकाणीच सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयावर नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पाच दिवसांत रुग्णालय स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, १२ दिवस उलटल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नव्हती. हे रुग्णालय सुमारे ३.५ लाख लाभार्थी आणि १० लाख विमाधारकांना आरोग्य सेवा पुरवते. यामध्ये प्रयोगशाळा आणि स्कॅनिंग यासारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत.
६ फेब्रुवारी रोजी आम. असिफ सेठ यांनी कामगार मंत्री संतोष लाड यांना पत्र सादर करून नवीन पर्याय मिळेपर्यंत स्थलांतर रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकारने तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर प्रक्रिया स्थगित केली आहे.
अशोकनगर येथील रुग्णालय इमारत अत्यंत जीर्ण आणि धोकादायक स्थितीत आहे. अशोकनगर रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय असल्याने नवीन इमारतीसाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र, नवीन इमारतीचे काम सुरू करण्यापूर्वी रुग्णसेवा स्थलांतरित करणे आवश्यक होते.
गेल्या तीन वर्षांपासून नवीन ठिकाणाच्या शोधासाठी प्रयत्न सुरू होते आणि यमनापूर हे संभाव्य स्थळ म्हणून निश्चित करण्यात आले होते. मात्र, लाभार्थ्यांनी उपचार सोयींच्या गैरसोयीमुळे या स्थलांतरास विरोध केला.
यमनापूरला स्थलांतर करण्याच्या निर्णयाला विरोध झाल्यानंतर सध्याच्या रुग्णालयाच्या आवारातच पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर स्थलांतराची प्रक्रिया थांबविण्यात आली असून रुग्णांना अजूनही जीर्ण अवस्थेतील अशोकनगर इमारतीतच उपचार घ्यावे लागणार आहेत.