Monday, January 6, 2025

/

येळ्ळूरनगरीत घुमणार साहित्याचा जागर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील येळळूर येथे 5 जानेवारी रोजी 20 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरविण्यात येणार आहे.

या संमेलनास प्रमुख पाहुण्या म्हणून अभिनेत्री वंदना गुप्ते उपस्थित राहणार असून विविध सत्रांमध्ये साहित्य, कला आणि हास्याचा उत्सव साजरा होणार आहे.

येळळूर येथील परमेश्वर नगर येथे 20 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. शरद बाविस्कर हे असणार आहेत, जे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील ज्येष्ठ साहित्यिक व लेखक आहेत. संमेलनाची सुरुवात सकाळी 8:30 वाजता चांगळेश्वरी मंदिरापासून ग्रंथदिंडीने होणार आहे.

सकाळी 10 वाजता उद्योजक आर. एम. चौगुले यांच्या हस्ते उद्घाटन होईल. स्वागताध्यक्ष दुधाप्पा बागेवाडी उपस्थितांचे स्वागत करतील. अध्यक्षीय भाषण सकाळी 10:45 वाजता होईल. दुसऱ्या सत्रात पुण्यातील साहित्यिक दत्ता देसाई “आपली संस्कृती, आपला विकास” या विषयावर विचार मांडतील. तिसऱ्या सत्रात शैक्षणिक पुरस्कार वितरण होणार आहे. या सत्रात “एक तास बसा… मनसोक्त हसा” हा विनोदी कार्यक्रम प्रा. रणजीत कांबळे सादर करतील.

चौथ्या सत्रात अभिनेत्री वंदना गुप्ते यांची प्रकट मुलाखत होईल, ज्यामध्ये त्यांचे अनुभव आणि विचार रसिकांसमोर येतील. शेवटच्या पाचव्या सत्रात “जागर लोककलेचा” हा भारुड आणि जुगलबंदी कार्यक्रम संदीप मोहिते व आबा चव्हाण सादर करतील.

संमेलन नगरीचे नाव दिवंगत ॲड. परशुराम नाईक यांच्या स्मरणार्थ देण्यात आले आहे. तर प्रवेशद्वाराला दिवंगत साहित्यिक महादेव मोरे, यासह ग्रंथदालनाला दिवंगत बाबुराव गोरल यांचे नाव, तर सभामंडपाला दिवंगत रामचंद्र गोरल यांचे नाव देण्यात आले आहे.

संमेलनाची सुरुवात सकाळी 8:30 वाजता चांगळेश्वरी मंदिरापासून निघणाऱ्या ग्रंथदिंडीने होईल. सकाळी 10:00 वाजता संमेलनाचे उद्घाटन संपन्न होणार असून त्यानंतर 10:15 ते 10:45 वाजेदरम्यान स्वागत व अध्यक्षीय भाषण होईल. दुपारी 1:00 वाजता प्रकट विचार सादर केले जातील. त्यानंतर 2:30 ते 3:00 वाजेपर्यंत अल्पोपहार, दुपारी 3:00 ते 4:00 वाजेदरम्यान विनोदी कार्यक्रम रंगणार आहे, ज्यामध्ये रसिक प्रेक्षकांना हास्याचा आनंद मिळेल.

त्यानंतर दुपारी 4:00 ते 5:00 वाजेदरम्यान अभिनेत्री वंदना गुप्ते यांची विशेष मुलाखत होणार आहे. संमेलनाचा समारोप संध्याकाळी 5:00 ते 6:30 वाजेदरम्यान होणाऱ्या जुगलबंदी भारुड कार्यक्रमाने होईल. साहित्य रसिकांनी या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.