बेळगाव लाईव्ह : स्मार्ट सिटी अंतर्गत विकास करण्यात आलेला आणि भविष्यात देखील कोट्यवधी रुपयांच्या निधीतून विकासाधीन असलेला बेळगावमधील किल्ला तलाव प्रदूषणाच्या विळख्यात सापडला असून या तलावातील मासे मृतावस्थेत आढळून आले आहेत. या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून माशांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी विविध तज्ञांची टीम स्थापन करण्यात आली आहे.
बेळगावातील ऐतिहासिक किल्ला तलावामध्ये मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली असून याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी मत्स्य विभाग, पाणी गुणवत्ता तपासणी संस्था आणि पशुवैद्यकीय विभागाच्या तज्ञांची एक संयुक्त टीम स्थापन करण्यात आली आहे.
या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने त्वरीत पाऊले उचलण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले असून तलावामधील मृत मासे त्वरीत हटवून पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात, यासोबतच तलावाच्या पाण्याची गुणवत्ता आणि मासे यांची नियमितपणे तपासणी केली जाणे अत्यावश्यक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत म्हणून स्थानिक प्रशासनाने कडक पावले उचलावीत, असेही मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
या तलावाचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत बेळगावच्या माजी जिल्हाधिकारी आणि महापालिका प्रशासक या पदाच्या कार्यकाळापासून बेळगावशी जवळचे संबंध असलेल्या राज्याच्या मुख्य सचिव डॉ. शालिनी रजनीश यांच्या नेतृत्वाखाली डिसेंबर २०२४ मध्ये ९.२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे .
यादृष्टीने बेळगाव मनपाने आराखडाही तयार केला आहे. एकीकडे या तलावाचा संपूर्ण कायापालट करण्याचा विचार सुरु असतानाच तलावाचे अशा पद्धतीने प्रदूषण झाल्याचे समोर आल्याने याबाबत प्रश्नचिन्ह उभारत आहे.
संपूर्ण तलावाचे सौंदर्यीकरण, तलाव परिसरात मनोरंजनात्मक पार्क, उद्यान अशा पद्धतीचा विकास करण्यात आला असला तरी, तलावातील पाण्याची योग्यरित्या देखभाल होत नसल्याने तलावातील माशांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. तसेच त्यातील पाणी पूर्णपणे दूषित झाल्याने मासे मृतावस्थेत आढळण्याच्या प्रकारात वाढ होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षात अशा घटना वाढल्या असून तलावातील पाणी दूषित होण्यामागे कोणती कारणे आहेत, याचा तपास घेणे गरजेचे आहे. एकीकडे तलाव परिसराचे सुशोभीकरण आणि ऐतिहासिक स्थळ अधिकाधिक विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरु असताना अशापद्धतीने तलावाचे होत असलेले नुकसान पाहता याबाबत संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना आखणे गरजेचे आहे.