बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिका व्याप्तीतील प्रभाग समित्या स्थापन करण्यासाठी या समितीमधील प्रभाग निहाय रिक्त पदे भरण्यासंदर्भातील अधिसूचना तात्काळ जारी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त आणि घेतला आहे. ज्यामध्ये अर्ज सादर करण्याचा कालावधी 22 दिवसांपर्यंत वाढविण्यात आला असून येत्या दोन-तीन दिवसात ही अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे.
बेळगाव महापालिकेकडून प्रभाग समिती नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात आले होते मात्र या अर्जासंबंधी कोणताच निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे दाखल अर्जांची स्थिती काय आहे .
या संदर्भातील माहितीही देण्यात आलेली नाही त्यामुळे याबाबतीत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा अशा मागणीचे निवेदन अर्जदारांच्यावतीने प्रभाग समिती बळग काल गुरुवारी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले होते.
उभय अधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून त्वरेने योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यापूर्वी तुमच्या कार्यालयाने तीन वेळा प्रभाग समिती रचनेसाठी अर्ज मागविले आहेत. प्रत्येक वेळी आम्ही त्याला प्रतिसाद देऊन त्वरित अर्ज सादर केले आहेत. त्यानंतर अर्जांचे प्रभागनिहाय तपशील मिळवण्यासाठी महापालिका कौन्सिल विभागाकडे अनेक पत्रे आणि वैयक्तिक भेटीद्वारे चौकशी केली. तुमच्या कार्यालयाशीही संपर्क साधला. मात्र आम्ही वारंवार प्रयत्न करूनही आम्हाला अद्याप अर्जाच्या स्थितीबाबत कौन्सिल विभाग किंवा महापालिकेकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.
तरी प्राप्त अर्जांचा प्रभाग निहाय तपशील देऊन प्रभाग समिती रचना करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात यावा, अशा आशयाचा तपशील मनपा आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे. सदर निवेदन सादर करतेवेळी प्रभाग समितीचे संयोजक अनिल चौगुले, विकास कलघटगी, प्रसाद कावळेकर, डॉ. एस. व्ही. दिवेकर, ॲड. प्रथमेश कारेकर, सुरेशबाबू सन्नक्की, लक्ष्मण हणमसागर, रामकृष्ण तेंडुलकर, मनीषा सिंग, सरोज अळवणी, रेश्मा जाधव, सुधा माणगांवकर, उर्मिला माळी, अर्चना पाटील, लक्ष्मी तहसिलदार, अजित कुडची, ॲड. वैभव कुट्रे आदी प्रभाग समितीसाठी इच्छुक अनेक अर्जदार उपस्थित होते.
निवेदन सादर करण्यात आल्यानंतर काल गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजता प्रभाग समिती अर्जांबाबत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीला महापालिका आयुक्त शुभा बी., महापालिकेचे विभागीय अधिकारी तसेच संबंधित अन्य अधिकाऱ्यांसह बेळगाव प्रभाग समिती बळगचे संयोजक अनिल चौगुले आणि विकास कलघटगी उपस्थित होतो. बैठकीत प्रभाग समित्या स्थापन करण्यासाठी दाखल झालेल्या प्रभागनिहाय अर्जांवर सविस्तर आणि सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी बेळगाव प्रभाग समिती बळगचे संयोजक संयोजक या नात्याने अनिल चौगुले यांना आयुक्तांच्या कार्यालयाकडून प्रभागनिहाय अर्जांचा तपशील देण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत अनेक प्रभागांमधून आलेल्या अर्जांमध्ये लक्षणीय त्रुटी असल्याचे अधोरेखित करण्यात आले.
बेळगाव प्रभाग समिती बळगच्या दृष्टिकोनातून 25 हून अधिक प्रभागांमध्ये 6 किंवा अधिक वैध अर्ज प्राप्त झाले आहेत, असे स्पष्ट करण्यात आले. तसेच मंगळूर महानगरपालिकेने अवलंबलेल्या मॉडेलचा अवलंब केल्यास शहरातील 50 टक्क्यांहून अधिक प्रभागांमध्ये कार्यक्षम समित्या तयार होऊ शकतात, असे निरीक्षण बैठकीत नोंदवले गेले.
प्रभाग समिती स्थापन करण्यासंबंधीच्या नगर पालिका अधिनियमाचा संदर्भ घेत मनपा आयुक्त शुभा बी. यांनी स्पष्ट केले की, प्रभाग समिती स्थापन करण्यासाठी प्रति प्रभाग किमान 10 सदस्यांचे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. या चर्चेच्या अनुषंगाने आयुक्तांनी प्रभाग समिती अर्जांसाठी चौथी अधिसूचना जारी करण्याचा अर्ज सादर करण्याचा कालावधी 3 दिवसांवरून 15 दिवसांपर्यंत वाढवणारा प्रस्ताव ठेवला. तथापि नागरिकांचे संघटन करण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, बेळगाव प्रभाग समिती बळगने अधिसूचना जारी करण्यापूर्वी किमान तीन आठवड्यांचा तयारी कालावधी सुचवला. शेवटी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि मनपा आयुक्त शुभा बी. यांनी चौथी अधिसूचना तत्काळ जारी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये अर्ज सादर करण्याचा कालावधी 22 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला. ही अधिसूचना पुढील 2 -3 दिवसांत जाहीर होण्याची शक्यता आहे.
सदर बाब बेळगावातील नागरिक, वॉर्ड मित्र आणि समन्वय समित्यांकरिता प्रभागनिहाय रिक्त पदे भरण्यासाठी अर्जांवर लक्ष केंद्रित करण्याची सुवर्णसंधी आहे. तेंव्हा इच्छुक आणि समान विचारसरणीच्या नागरिकांनी त्वरित संघटित होऊन अर्ज भरून आपल्या प्रभागाच्या विकासासाठी त्यांचे योगदान देण्याची आवश्यकता आहे. सर्वांनी लवकरात लवकर सहभाग घेऊन योग्य प्रतिनिधित्व आणि सहभाग सुनिश्चित करावा, असे आवाहन बेळगाव प्रभाग समिती बळगचे संयोजक अनिल चौगुले यांनी केले आहे.