बेळगाव लाईव्ह : रहदारीच्या नियमांचे पालन करण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना अनेकवेळा रहदारी विभागाकडून आवाहन करण्यात येते. बहुतांशवेळा कोणत्याच नियमांचे अनेक नागरिक पालन करत नाहीत. अशा नागरिकांवर वाहतूक विभागाच्यावतीने कारवाई केली जाते. कित्येकवेळा वाहतूक पोलीस सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास देत वेठीला धरतात. मात्र आज चक्क रहदारी नियमांच्या भंगाबद्दल पोलिसांकडून पोलिसांवरच कारवाई झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
रहदारी पोलीस सर्वसामान्य वाहन चालकांवर कारवाई करतात हे सर्वश्रुत आहे. मात्र रहदारी नियमांसंदर्भात पोलिसांनीच पोलिसांवर कारवाई केल्याची दुर्मिळ घटना आज शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून घडल्याचे पहावयास मिळाले.
याबाबत अधिक माहिती आधी कि, शहरातील रहदारी नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील असलेले पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांना आपल्याच कार्यालयातील काही पोलीस कर्मचारी रहदारी नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले.
संबंधित पोलीस कर्मचारी आपल्या दुचाकीवरून कार्यालयाकडे ये-जा करताना हेल्मेट परिधान करत नव्हते. या पद्धतीने कायद्याचे रक्षण करणारे पोलीसच नियमांचे उल्लंघन करत असल्यामुळे संतप्त झालेल्या पोलिस आयुक्तांनी त्यांच्यावर रहदारी नियम उल्लंघनाबद्दल सर्वसामान्यांप्रमाणे रीतसर कारवाई करण्याचे आदेश दिले.
सदर आदेश मिळताच आज गुरुवारी सकाळी रहदारी पोलिसांनी पोलीस आयुक्तयालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावरच मोर्चे बांधणी केली. त्यानंतर आपल्या दुचाकीवरून हेल्मेट परिधान न करता आयुक्तालयाकडे येणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना अडवून त्यांच्यावर वाहतूक नियम उल्लंघनाची कारवाई करण्यात येत होती.
पोलीस आयुक्तलयासमोर रहदारी पोलिस चक्क आपल्या पोलीस बांधवांवरच करत असलेल्या कारवाईच्या या घटनेची बेळगावमध्ये मोठी चर्चा रंगली होती.