बेळगाव लाईव्ह :एकाच्या संशयीत मृत्यूच्या साध्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या नेतृत्वाखालील यमकनमर्डी पोलिसांनी पाळेमुळे खणून तब्बल तीन खून प्रकरणांचा छडा लावण्याचा पराक्रम केला असून खून प्रकरणी एकूण 6 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.
जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. उघडकीस आलेल्या खून प्रकरणांसंदर्भात माहिती देताना पोलीस अधीक्षक डॉ. गुळेद यांनी सांगितले की, यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गेल्या शुक्रवारी 10 जानेवारी रोजी कल्लाप्पा भीमाप्पा सुटगन्नावर (रा. हळ्ळदकेरी, हुक्केरी) या व्यक्तीने आपल्या भावाच्या संशयास्पद मृत्यूची तक्रार नोंदवली होती.
सदर तक्रारीनुसार त्यांचा भाऊ महांतेश आपली पत्नी माला हिच्या कुटुंबीयांसमवेत राहत होता. मागील वर्षी एप्रिल महिन्यात अचानक त्याचा मृत्यू झाला. निधनानंतर त्याच्या मृतदेहाचे घाईगडबडीने दफन करण्यात आले. त्यामुळे कल्लाप्पा यांनी आपल्या भावाच्या मृत्यूबद्दल खास करून त्याची पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांवर संशय व्यक्त केला आहे. कल्लाप्पा यांनी पोलिसात तक्रार नोंदविल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 11 जानेवारी रोजी मयताची पत्नी संशयित माला हिला तिच्या कुटुंबीयांसमवेत पोलिसांसमक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले. त्यानंतर मालासह तिच्या कुटुंबातील प्रत्येकाची चौकशी करण्यात आली. पोलीस चौकशीत माला हिने आपणच आपल्या पतीच्या मृत्यूस कारणीभूत असल्याची कबुली दिली.
अधिक तपासात माला हिने आपल्या पतीला ठार मारण्यासाठी आकाश बसलिंगप्पा गोकावी याला 70 हजार रुपयांची सुपारी दिली होती. ते पैसे तिने पेटीएमच्या माध्यमातून आकाशला दिले होते. त्यावरून आकाश याला तात्काळ अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. पोलीस चौकशीत आकाश याने तो स्वतः आणि त्याचे अन्य दोन सहकारी रमेश लगमप्पा माळगी (रा. हट्टीअलुर) व अप्पांना मुशप्पा नाईक (रा. पाच्छापूर) अशा तिघा जणांनी मिळून आणखी दोघा जणांचा खून केला असल्याची कबुली दिली. खून झालेल्यांपैकी नागाप्पा याला ठार मारण्यात आल्यानंतर अपघाती मृत्यू दर्शवण्यासाठी त्याचा मृतदेह जवळच्या रेल्वे रुळावर नेऊन टाकण्यात आला होता. या संदर्भात यमकणमर्डी पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या सहकार्याने आणखी तपास केला असता गेल्या 2022 मध्ये एका नैसर्गिक मृत्यूच्या घटनेची नोंद आरोपींनी ज्या ठिकाणी नागाप्पा याचा मृतदेह टाकला होता त्या ठिकाणी झाल्याचे उघडकीस आले.
त्यामुळे त्या अनैसर्गिक मृत्यूची नोंद बदलून खुनाची घटना अशी करण्यात आली आहे. खून झालेल्या नागाप्पाच्या बाबतीत त्याची पत्नी यल्लमा हिने आपल्या पतीला ठार मारण्यासाठी सुमारे 3 लाख रुपयांची सुपारी आकाश याला दिली होती. त्यानंतर आकाश याने आपले सहकारी रमेश व आप्पांना यांच्या मदतीने खुनाचा कट रचला. त्यांनी नागाप्पाला कुंदरगी जवळील टेकडीच्या ठिकाणी नेऊन यथेच्छ दारू पाजली आणि त्यानंतर नायलॉनच्या दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. नागाप्पाला ठार मारल्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह जवळच असलेल्या रेल्वे रुळावर नेऊन टाकला.
आकाश आणि त्याचे दोन सहकारी या त्रिकूटाने दुसरा खून विठ्ठल माळगी याचा केला. दुसरा आरोपी रमेश माळगी याचा तो भाऊ होता. या प्रकरणात विठ्ठल याने 22 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते जे त्याला फेडता येत नव्हते. त्यामुळे कर्ज वसुलीसाठी कर्ज देणाऱ्या संबंधित लोकांकडून रमेश आणि विठ्ठल यांच्या कुटुंबाला त्रास दिला जात होता त्यामुळे त्रस्त झालेल्या रमेशने आपल्या भावाचाच काटा काढण्याचा निर्णय घेतला आणि आपले मित्र आकाश व आप्पांना यांच्या मदतीने त्याचा खून केला. खून करण्यासाठी त्यांनी नागाप्पाच्या बाबतीत जी पद्धत अवलंबली होती तीच पद्धत अवलंबली. त्यांनी प्रथम विठ्ठल याला दारू पाजली त्यानंतर गळा आवळून त्याला ठार मारले व नंतर त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर नेऊन टाकण्याऐवजी परत गावात नेऊन रस्त्याकडेला टाकला. तसेच मृतदेहाशेजारी विठ्ठलाची मोटरसायकल टाकून तो दारूच्या नशेत मोटरसायकल वरून पडून ठार झाल्याचा आभास निर्माण केला.
माळगी कुटुंबीयांनी देखील प्रकरण वाढू नये यासाठी पोलिसांना न कळवता घाईगडबडीने मयत विठ्ठला दफन केले. खुनाच्या या तीनही प्रकरणात पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या नेतृत्वाखालील आमच्या यमकणमर्डी पोलिसांनी अत्यंत वेगाने चौकशी व तपासाची सूत्रे फिरवून आरोपींना गजाआड करण्याची उत्कृष्ट कामगिरी बजावली. एका संशयित मृत्यूच्या साध्या तक्रारीवरून त्यांनी 2022 मधील दोन खून आणि 2024 मधील एक खून अशा तब्बल तीन खून प्रकरणांचा छडा लावला आहे. सदर कामगिरी बजावणाऱ्या यमकनमर्डी पोलीस पथकाचे आम्ही खास अभिनंदन करतो असे सांगून तीनही खून प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यांमध्ये आकाश, आप्पांना, रमेश, खून झालेल्या दोघांच्या पत्नी व अन्य एकाचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.