बेळगाव लाईव्ह :इंस्टाग्रामच्या माध्यमातून परिचय झालेल्या एका अल्पवयीन मुलीसह तिच्या मैत्रिणीवर पाशवी बलात्कार केल्यानंतर त्या बलात्काराचे व्हिडिओ व फोटो काढून संबंधित मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्या तिघा जणांना हारूगिरी पोलिसांनी अवघ्या 24 तासात गजाआड केले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. प्रकरणाची माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. गुळेद यांनी सांगितले की, गेल्या सोमवारी आमच्याकडे एका अल्पवयीन मुलीने बलात्कार व ब्लॅकमेलींगची तक्रार केली. त्या तक्रारीनुसार तिला आणि तिच्या अल्पवयीन मैत्रिणीला अभिषेक नामक व्यक्तीने विश्वासात घेऊन आपण तिघेही सौंदत्तीला यात्रेला जाऊया असे सांगितले.
त्यानंतर त्या दोन मुलींना तो हारुगेरी बस स्थानकाजवळून कारगाडीतून घेऊन निघाला. त्यावेळी त्या कारमध्ये आणखी दोघेजण म्हणजे कौतुबबानू उर्फ बापूसा बडिगेर आणि आदिलशा जमादार हे बसले होते. या पद्धतीने कारमध्ये एकूण पाच जण होते. प्रवासाला सुरू झाल्यानंतर काही वेळाने एका टेकडी जवळ पीडित मुलगी जिने तक्रार नोंदवली तिला गाडीतून उतरवून टेकडी मागे नेण्यात आले.
त्या ठिकाणी अभिषेकने तिच्यावर पाशवी बलात्कार केला. त्याचबरोबर कारचालक बापूसा बडिगेर यानेही प्रतिकार करणाऱ्या त्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. त्यावेळी व्हिडिओ चित्रीकरण आणि कांही छायाचित्र देखील घेण्यात आली. अत्याचारग्रस्त मुलगी जेंव्हा कार गाडीकडे परतली त्यावेळी कारमधील तिसरा इसम आदिलशा हा त्या दुसऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करत होता.
याप्रकरणी हारुगेरी तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेण्यात आला आणि त्यानंतर अवघ्या 24 तासात पोलिसांनी तीनही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तपासात असे आढळून आले आहे की पीडित मुली इंस्टाग्रामच्या माध्यमातून आरोपीच्या संपर्कात होत्या. यासंदर्भात पीडित मुलीने सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्मवर कांही रील देखील प्रसिद्ध केले होते. त्याचप्रमाणे मुख्य आरोपी अभिषेक तिला येऊन भेटत असल्यामुळे त्यांच्यात जवळीक निर्माण झाली होती.
यामध्ये प्रामुख्याने नोंद घेण्याजोगी बाब म्हणजे युवा पिढीसह जे कुणी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरत आहेत त्यांनी आपण त्यावर काय प्रसिद्ध करतो याबाबत दक्षता बाळगली पाहिजे. सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी असे माझे सर्वांना आवाहन आहे. आरोपींना आम्ही ताब्यात घेतले असून त्यांच्यावर आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे.
प्रारंभी अत्याचाराची घटना घडल्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलीला मोठा धक्का बसला होता. त्यामुळे त्यावेळी काय करायचे हे तिला सुचले नाही. मात्र धक्क्यातून सावरल्यानंतर तिने पोलिसात तक्रार नोंदवली. बलात्काराच्या घटनेनंतर परवा तीन दिवसांनी आरोपीने पीडित मुलीशी संपर्क साधला. तसेच पुढच्या आठवड्यात तू आणि तुझी मैत्रीण पुन्हा माझ्यासोबत गोव्याला आलं पाहिजे, अन्यथा तुझ्या बलात्काराचे व्हिडिओ शूटिंग आणि काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेन अशी धमकी दिली. तेंव्हा घाबरलेल्या त्या मुलीने आपल्या नातलगाना घडल्या घटनेची माहिती देण्याबरोबरच गेल्या सोमवारी पोलिसात तक्रार नोंदविण्याचे धाडस दाखवले.
आम्हाला आरोपीच्या मोबाईलमध्ये कांही व्हिडिओ सापडले आहेत. तो मोबाईल जप्त करून पुढील तपासासाठी सायबर फॉरेनसिक लॅबकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी शेवटी दिली.