बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेची करवसुली शिल्लक असून महापालिकेने कर वसुलीसाठी पावले उचलली पाहिजेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली.
बंगळुरू येथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, काँग्रेस अधिवेशनात कोणाचीही उपेक्षा झाली नाही. आम्हाला दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडली आहे. जिल्हाध्यक्षपदासाठी कोणतेही लॉबिंग झालेले नाही. आम्ही फक्त एकच नाव पाठवले आहे. जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीत कोणताही मतभेद नाही. सर्वजण एकमतानेच नाव सुचवले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, या बैठकीत पक्ष संघटन आणि 2028 मध्ये पुन्हा काँग्रेस सरकार आणण्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्री बदलाच्या विषयावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री बदलाबाबतच्या कराराविषयी मला काहीही माहिती नाही. आम्ही त्या चर्चेपासून खूप दूर आहोत, असेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री आणि जारकीहोळी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत बोलताना ते म्हणाले, मुख्यमंत्री आमच्या घरी येणे नवीन नाही. आम्हीही त्यांच्या घरी जातो. नवीन वर्षाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र आलो होतो. त्या ठिकाणी राजकीय विषय, पक्ष संघटन, आणि 2028 मध्ये सरकार स्थापन करण्यावर चर्चा झाली. मात्र, मुख्यमंत्री बदलाबाबत कोणतीही चर्चा किंवा करार झालेला नाही.
एका व्यक्तीला एकाच पदाचा नियम आहे. परंतु, कधी कधी कौशल्य आणि गरजेनुसार दोन पदे देण्यात आली आहेत. पक्षाचा निर्णय आम्ही कधीही प्रश्नार्थ घेणार नाही. मंत्रिमंडळ बैठकीत केपीसीसी अध्यक्षपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. सध्या डी.के. शिवकुमार अध्यक्ष आहेत. योग्य वेळी त्याबाबत चर्चा करू, असे जारकीहोळी यांनी सांगितले.