बेळगाव लाईव्ह : सतिश जारकीहोळी यांना काँग्रेसकडून नोटीस दिली असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असे स्पष्ट वक्तव्य राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केले.
काँग्रेसकडून कोणत्याही मंत्र्यांना किंवा व्यक्तीला नोटीस पाठविण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भाजपकडून प्रायोजित केलेल्या निराधार अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे सुरजेवाला यांनी सांगितले. आज बेळगावच्या सांबरा विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुरजेवाला यांनी सतिश जारकीहोळी यांना नोटीस देण्यात आली असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला. केपीसीसी अध्यक्ष बदलण्याच्या चर्चा सुरू आहेत. जर तसे असेल, तर सध्याचे अध्यक्ष बेळगावमध्ये का आले आहेत? असा प्रश्न सुरजेवाला यांनी विचारला.
२१ जानेवारीला बेळगावमध्ये ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ या रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह देशभरातील काँग्रेस नेते सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. गृहमंत्री अमित शाह आणि भाजप नेते संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अपमान करत आहेत. देशातील श्रीमंत-गरीब वर्गामध्ये भेदभाव वाढवला जात आहे आणि संविधानिक हक्कांना पायदळी तुडवले जात आहे, असा आरोप सुरजेवाला यांनी केला.
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीच्या आधारे देशात नवी क्रांती करण्याची गरज आहे. १०० वर्षांपूर्वी झालेल्या बेळगाव काँग्रेस अधिवेशनाने ब्रिटिशांविरोधात क्रांतीचे ठिणगी पेटवली होती.
त्याचप्रमाणे, आता देशातील अन्यायाविरोधात क्रांतीचा आवाज उठवण्याचा निर्धार आहे, असे त्यांनी सांगितले. २७ जानेवारीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमी महू (मध्य प्रदेश) येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. बेळगावची भूमी केवळ ऐतिहासिक नाही, तर देशातील राजकीय परिवर्तनासाठी नवा दिशादर्शक ठरणार आहे, असे सुरजेवाला यांनी आवर्जून सांगितले.