बेळगाव लाईव्ह : कोविड कालावधीपासून शहर – परिसर तसेच ग्रामीण भागातही भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे आजवर अनेक लहान मुले तसेच नागरिक देखील जखमी झाले आहेत. भटक्या कुत्र्यांनी आज अनगोळच्या चिदंबरनगर येथील ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीचा बळी घेतला असून या घटनेमुळे नागरीकातून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
चिदंबरनगर अनगोळमध्ये एका वृद्धावर सुमारे 8 ते 10 भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केला. या हल्ल्यात वृद्धाचे कपडे फाडण्यात आले आणि गंभीर जखमा केल्या. या हल्ल्यात वृद्ध व्यक्तीच्या होता पायाला गंभीर इजा झाल्याचेही समजले असून आज सकाळी स्थानिक नागरिकांना वृद्ध व्यक्ती जखमी अवस्थेत पडल्याचे आढळून आले. यावेळी कुत्र्यांनी हल्ला केल्याचे स्पष्ट दिसून येत असल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
शहर परिसरात भटक्या कुत्र्यांकडून केवळ पादचाऱ्यांवर हल्ला होत नसून वाहनांचा पाठलाग करून कुत्री हैदोस मांडत आहेत. कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक लहान मुलेदेखील जखमी झाली असून वारंवार अशा गोष्टी घडत असल्याने पालिकेने तातडीने या समस्येवर उपाय करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.
गेल्या ३ ते ४ वर्षात भटक्या कुत्र्यांनी सर्वत्र हैदोस घातला असून महानगरपालिकेने नसबंदी मोहीम देखील हाती घेतली होती. मात्र नसबंदी मोहीम कितपत यशस्वी झाली? सदर मोहीम सुरु आहे कि ठप्प झाली? नागरिकांना सतावणाऱ्या भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर पालिका प्रशासन डोळे झाकून गप्प का बसली आहे? असे संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.
उद्यामबाग पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, सीपीआय धरेंगोंडा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.