बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात स्पा सेंटर आणि मसाज सेंटर मोठ्या प्रमाणात फोफावले असून बहुतांशी स्पा सेंटरमध्ये अवैधरित्या वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे निदर्शनात येत आहे. गेल्या वर्षभरात पोलिसांनी अशा स्पा सेंटरवर धाड टाकून कारवाईचा सपाटा सुरु केला असून आज अनगोळ येथील मुख्य रस्त्यावर असणाऱ्या ‘अंजली’ स्पा सेंटरवर धाड टाकून कारवाई केली आहे.
सदर स्पा सेंटर मध्ये अवैधरित्या सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा पडदापाश करण्यात आला असून वेश्या व्यवसाय चालविण्यात येत असलेल्या या केंद्रातून तब्बल सहा महिलांची सुटका करून स्पा सेंटर चालविणाऱ्या महिलेला सीईएन पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हि धडक कारवाई करण्यात आली असून पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव सीईएन पोलीस ठाण्याचे पीआय बी. आर. गड्डेकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली आहे. संकेश्वर आणि काकती येथील वेश्याव्यवसायात अडकलेल्या सहा महिलांची सुटका करण्यात आली आहे.
मसाज सेंटरच्या नावाखाली स्पामध्ये देहविक्रय होत असल्याच्या तक्रारी पुढे येत असून अवैध व्यवसायाचे केंद्र बनलेल्या अशा स्पा सेंटरची पाळेमुळे बेळगाव शहरात किती खोलवर रुजली गेली आहेत, याची प्रचिती दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
अशा स्पा सेंटरच्या आडून आयुर्वेदिक, थाई, मसाज सेंटरच्या नावाखाली राजरोसपणे वेश्याव्यवसायाची दुकाने थाटली जात असल्याचे वास्तव आहे. प्रामुख्याने स्पाची सध्या चलती आहे. पर्यटन व्हिसावर आलेल्या विदेशी तरुणी येथे काम करताना दिसून येतात. शिवाय अलीकडे स्थानिक महिलाही यात गोवल्या गेल्याचे समोर आले आहे.
बेळगाव शहर आणि परिसरात असे अनेक स्पा सेंटर सुरु आहेत. स्पा सेंटरच्या नावाखाली पडद्या आड अवैध वेश्या व्यवसाय सुरु आहे. अशाठिकाणी उच्चभ्रू लोकांची अधिकाधिक जा ये असल्याचे वास्तव समोर आले असून अशा अवैध पद्धतीने सुरु असलेल्या स्पा सेंटरचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी वाढत चालली आहे.
स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या हायप्रोफाईल देहविक्रीच्या धंद्याची पाळेमुळे खोदून काढावीत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.