बेळगाव लाईव्ह :घरगुती भांडणातून जावयाने चाकूचे वार करून आपल्या सासूचा निर्घृण खून केल्याची घटना शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रयत गल्ली येथे आज मंगळवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
खून झालेल्या महिलेचे नांव रेणुका पदमुकी (वय 43, मूळ रा. कल्याणनगर) असे असून ती आरोपीची सासू होती. तिच्यावर हल्ला करणारा तिचा जावई आरोपी शुभम दत्ता बिर्जे (वय 24) हा रयत गल्ली येथील रहिवासी आहे.
सदर खून प्रकरणी शुभम याच्यासह त्याची आई सुजाता आणि वडील दत्ता बिर्जे अशा तिघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. खुनाच्या प्राथमिक तपासातील माहितीनुसार शुभम बिर्जे याचा 7 महिन्यापूर्वी नोंदणी पद्धतीने विवाह झाला आहे.
त्याची पत्नी 3 दिवसांपासून आजारी होती आणि तो तिची काळजी घेत नव्हता. त्यामुळे सासूला तिची काळजी घेण्यासाठी आणि उपचारासाठी मदत करावी लागल होती. यासंदर्भात मुलाचे कुटुंब आणि मुलींच्या कुटुंबात आज मंगळवारी सकाळी जोरदार वादावादी झाली.
याचे पर्यवसान आरोपी शुभम याने संतापाच्या भरात आपली सासू रेणुका हिच्यावर चाकूने वार करण्यामध्ये झाले. पीडितेला गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू असून पोलीस निरीक्षक एस एस सिमानी अधिक तपास करत आहेत.