बेळगाव लाईव्ह :राकसकोप रोडवरील बुडा कॉलनी जवळील श्री हनुमान मंदिर सर्कल या ठिकाणी मुख्य हमरस्त्यावर मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहत असून येथील दुपदरी रस्त्याच्या दुतर्फा गटारी नसल्यामुळे गेल्या कांही वर्षांपासून उद्भवलेल्या या समस्येकडे कोणीच लक्ष देत नसल्याबद्दल वाहनचालक व नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
कॅम्प येथील मिलिटरी हॉस्पिटल म्हणजे शौर्य चौकापासून लक्ष्मी टेकडीच्या दिशेने जाणाऱ्या राकसकोप रोडचे गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी पेट्रोल पंप ते लक्ष्मी टेक दरम्यान दुपदरीकरण करण्यात आले आहे. मात्र या पद्धतीने रस्त्याचा विकास साधताना या रस्त्याला दुतर्फा गटारींची सोय करण्यात आलेली नाही.
परिणामी तेंव्हापासून राकसकोप रोडवरील बुडा कॉलनी जवळील श्री हनुमान मंदिर सर्कलच्या ठिकाणी रस्त्यावर सांडपाणी वाहण्याची समस्या उद्भवली आहे. सरस्वतीनगर पहिला क्रॉस येथील गटारींचे सांडपाणी मुख्य हमरस्त्याला गटार नसल्यामुळे निचरा न होता रस्त्याशेजारी तुंबून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या मुख्य रस्त्यावरून वाहत असते. या संदर्भात वेळोवेळी तक्रार करूनही हा प्रकार गेल्या तीन-चार वर्षांपासून सुरूच आहे.
सध्या देखील श्री हनुमान मंदिर सर्कलच्या ठिकाणी सरस्वतीनगर पहिला क्रॉस रस्त्याच्या टोकाला गटारीचे सांडपाणी रस्त्याशेजारी तुंबून मोठ्या प्रमाणात मुख्य रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे बेळगावच्या दिशेकडे रस्त्याकडेला गलिच्छ दलदल निर्माण होऊन दुर्गंधीचे वातावरण पसरलेले आहे. रस्त्यावरून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून दुर्गंधीमुळे नाक मुठीत धरून कसरत करत त्यांना मार्गक्रमण करावे लागत आहे. या त्रासात भर म्हणजे कांही वेळा एखादे वाहन भरधाव वेगाने रस्त्यावरून गेल्यास गलिच्छ दलदलयुक्त सांडपाण्याने पादचाऱ्यांचे कपडे रंगून गेल्यामुळे वादावादीचे प्रसंग घडत आहेत.
तरी गेल्या काही वर्षांपासून उद्भवलेल्या या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता तरी गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक व वाहन चालकांकडून केली जात आहे.