बेळगाव लाईव्ह : दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिराच्या विकासासाठी मंजूर 100 कोटी रुपयांच्या निधीबद्दल आभार व्यक्त करत, विविध विकासकामांबाबत चर्चा करण्यात आली.
खासदारांनी या भेटीदरम्यान पंतप्रधानांना “Temple Treasures: A Journey Through Time” हे ऐतिहासिक मंदिरांच्या वारशावरील पुस्तक भेटीदाखल दिले.
खासदारांनी श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिर, सौंदत्ती यांच्या पुनर्विकासासाठी मंजूर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या निधीबद्दल आभार मानले. त्यांनी या निधीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
याशिवाय, रामदुर्ग तालुक्यातील ऐतिहासिक शबरी कोळ्ळ परिसराचा विकास साधण्यासाठी केंद्र सरकारने विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी खासदारांनी केली. हा परिसर धार्मिक व ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग असून, त्याच्या विकासामुळे स्थानिक पर्यटनाला चालना मिळेल, असे खासदारांनी सांगितले.
तसेच खासदार शेट्टर यांनी सध्या बेंगळुरू ते धारवाड दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन बेळगावपर्यंत वाढवण्याची मागणी केली. ही सेवा बेळगाववासीयांची दीर्घकालीन मागणी असून, ती पूर्ण झाल्यास प्रवाशांसाठी ही सोय उपयुक्त ठरेल, असे सुचविले. तसेच, “उडान 3.0” योजनेच्या माध्यमातून बेळगाव व इतर टियर-2 शहरांना विमानसेवेचा लाभ मिळावा, अशी मागणीही खासदारांनी केली. या योजनेमुळे या शहरांचा सर्वांगीण विकास होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांच्या सर्व मागण्यांचे गांभीर्य ओळखून संबंधित मंत्र्यांना त्वरित कार्यवाहीचे निर्देश देण्याचे आश्वासन दिले.