बेळगाव लाईव्ह :शॉर्टसर्किटमुळे सुमारे 8 एकर उसाच्या मळ्याला भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी बेळगाव शहापूर शिवारामध्ये घडली. आगीमध्ये शेतातील शेड देखील जळून भस्मसात झाले.
आगीच्या भक्षस्थानी पडलेला ऊस सुधीर बिर्जे, विनायक बिर्जे, देवकुमार बिर्जे, माधव बिर्जे, चिन्नाप्पा होसुरकर व पांडुरंग बाळेकुंद्री यांच्या मालकीचा होता. मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव शहापूर शिवाराच्या दक्षिण भागात धामणे रोड शेजारी असलेल्या 8 एकर उसाच्या पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली.
पिकांमधून धूर येऊ लागतात आसपासच्या शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत उसाच्या वाळलेल्या पानांनी पेट घेऊन हा..हा म्हणता आग झपाट्याने संपूर्ण पिकात पसरण्यास सुरुवात झाली. झपाट्याने पसरलेल्या आगीने शेतातील शेडला देखील आपल्या विळख्यात घेऊन बेचिराख केले.
यावेळी प्रसंगावधान राखून एका शेतकऱ्याने आगीची माहिती अग्निशामक दलाला देताच त्यांनी पाण्याच्या बंबासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. त्यांच्या सकाळी उशिरापर्यंत सुरू असलेल्या प्रयत्नांमुळे अखेर आग आटोक्यात आली.
दरम्यान आगीची माहिती परिसरात पसरताच घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. आगीच्या या दुर्घटनेमुळे सुधीर बिर्जे, विनायक बिर्जे, देवकुमार बिर्जे, माधव बिर्जे, चिन्नाप्पा होसुरकर व पांडुरंग बाळेकुंद्री या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने पीडित शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.