बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात शहापूर पोलिसांनी चोरी प्रकरणी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून अंदाजे रुपये 90,000 किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
बेळगाव शहरात शहापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका महत्त्वाच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. शहापूर पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक 102/2024, कलम 304(2) अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात फिर्यादी कुमार नामदेव कदम, रा. ढोर गल्ली, मा. वडगाव, बेळगाव यांच्या तक्रारीनुसार तपास सुरू होता.
दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी वडगावातील जनता क्रॉस परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे प्रतीक उर्फ श्यान्या, (वय 25, रा. मलप्रभानगर, वडगाव, बेळगाव) आणि सागर गुरप्पा गोळर, (वय 27, रा. भारतनगर, पहिला क्रॉस, शहापूर, बेळगाव) अशी आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी अंदाजे रुपये 90,000 किंमतीच्या सोनसाखळ्या जप्त केल्या आहेत.
शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिदप्पा सिमानी यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक श्रीमती एन.एस. बसवा, सहायक पोलीस उपनिरीक्षक आर.आय. सनदी आणि कर्मचारी श्रीधर तळवाड, जगदीश हाडिमनी, शिवराज पचन्नावर आणि सिद्रामेश्वर मुळगखोड यांचा समावेश होता.
पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बनियांग (आयपीएस), उपायुक्त रोहन जगदीश (आयपीएस), आणि सहाय्यक पोलिस आयुक्त संतोष सत्यनायक (केएसपीएस) यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रभावी कारवाई पार पडली. या पथकाचे कौतुक बेळगाव शहराच्या पोलिस आयुक्तांनी केले आहे.