Saturday, January 18, 2025

/

‘त्या’ रस्त्याचे आणखी एक प्रकरण उघड : 2.60 कोटींची नुकसान भरपाई

 belgaum

बेळगाव लाईव्ह :शहापूर येथील बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पी. बी. रोड पर्यंतच्या स्मार्ट सिटी विभागाने केलेल्या वादग्रस्त रस्त्याचे आणखी एक भरपाई प्रकरण उजेडात आले असून याच रस्त्यासाठी वापरलेल्या 18 गुंठे जमिनीसाठी 2 कोटी 60 लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे.

बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पी. बी. रोड पर्यंतच्या सध्या बंद असलेल्या रस्त्याचा प्रकल्प राबवताना स्मार्ट सिटी विभागाने भूसंपादन न करताच तेथील सर्व्हे क्र. 321/ए/1,2,3 मधील 18 गुंठे जमिनीतून रस्ता तयार केला आहे. परिणामी त्या जागेचे मालक लक्ष्मी मारुती कंग्राळकर -पाटील, नागेश मारुती कंग्राळकर -पाटील व विशाल मारुती कंग्राळकर -पाटील यांनी उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता.

उच्च न्यायालयाने तो दावा बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केला होता. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात त्या दाव्यावर सुनावणी झाली असून संबंधित 18 गुंठे जमिनीसाठी 2 कोटी 60 लाख रुपये भरपाई देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला आहे. तथापि ही भरपाईची रक्कम महापालिकेने द्यावी की स्मार्ट सिटी विभागाने? याबाबत संभ्रम आहे.

कारण आदेशात असे नमूद करण्यात आलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार निधी उपलब्ध नसल्याने भरपाई देण्यास आपण असमर्थ असल्याची भूमिका स्मार्ट सिटी विभागाकडून मांडली जाणार असल्याचे समजते. तसे झाल्यास ही भरपाईची रक्कम बेळगाव महापालिकेला द्यावी लागणार आहे.

यापूर्वी सदर रस्त्याचे रीतसर भूसंपादन केले नसल्यामुळे बी. टी. पाटील यांच्याकडून भरपाई बाबतचा दावा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशावरून पाटील यांना 20 कोटी भरपाई देण्याचा आदेश बजावण्यात आला होता. ही भरपाई न मिळाल्यामुळे बी. टी. पाटील यांच्याकडून अवमान याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवरील सुनावणी वेळी 20 कोटी भरपाई ऐवजी पाटील यांची जमीन परत देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला त्यानुसार जमीन परत करून वादावर पडदा टाकण्यात आला. मात्र या प्रकरणामुळे सदर रस्ता रहदारीसाठी बंद झाला.

आता कंग्राळकर -पाटील यांच्या जागेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 2 कोटी 60 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश बजावल्यामुळे स्मार्ट सिटीचा बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पी. बी. रोड पर्यंतचा बंद असलेला रस्ता आता पुन्हा चर्चेत आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.