बेळगाव लाईव्ह :सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्र सरकारवर दबाव आणून न्यायालयीन लढ्याला चालना देण्यासाठी पुढारी वृत्त समुहाचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी नेतृत्व करावे, अशी विनंती मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकार्यांनी केली आहे. या लढ्यात सल्लागार म्हणून त्यांनी काम करावे, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात येणार आहे.
गेल्या 69 वर्षे सातत्याने सीमाभागातील जनता लढा देत आहे. डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सीमा प्रश्नात सक्रिय सहभाग घेतला आहे. सीमा प्रश्नावर 2014 पर्यंत न्यायालयातील कामकाज सुरळीत सुरू होते. पण, त्यानंतर कर्नाटकने अंतरिम अर्ज क्रमांक 12 अ दाखल केला. त्यावेळेपासून न्यायालयीन कामकाजात सुधारणा झाली नाही. सीमा प्रश्नावर महाराष्ट्रातील नेते आक्रमक होत नाहीत.
त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांना जाग आणण्यासाठी आणि न्यायालयीन लढ्याला चालना देण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, आपण सीमा प्रश्नावर असलेल्या तज्ज्ञ आणि उच्चाधिकार समितीमध्ये सहभागी व्हावे, अशी विनंती मध्यवर्ती समिती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी केली.
यावेळी डॉ. जाधव यांनी, सीमाप्रश्न सुटावा यासाठी आपण नेहमीच पुढाकार घेतला आहे. हा प्रश्न तडीस जावा, यासाठी आवश्यक मदत करण्यास मी तयार आहे. न्यायालयीन कामकाजाला गती मिळावी, सुनावणीला ज्येष्ठ विधीज्ञ हरिष साळवे यांनी बाजू मांडावी, यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिणार आहे. आपण नेहमीच सीमावासियांसोबत राहू, असे सांगितले. यावेळी तालुका म. ए. समिती सरचिटणीस ऍडव्होकेट एम. जी. पाटील उपस्थित होते.
आज मध्यवर्ती समिती नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार आणि शिंदे यांना पत्र पाठवून डॉ. जाधव यांना उच्चाधिकार समितीत सल्लागार म्हणून सहभागी करावे, अशी विनंती करण्यात येणार असल्याचे समजते.
दरम्यान समितीने नेते आर एम चौगुले, नगरसेवक रवी साळुंखे आणि श्रीकांत कदम यांनीही दैनिक पुढारीचे संपादक प्रताप सिंह जाधव यांच्याशी भेटून सविस्तर चर्चा केली आहे आणि सीमा लढ्यात सक्रिय होण्याची मागणी केली आहे.