बेळगाव लाईव्ह : कॅन्सर रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता, राज्य सरकारने प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कॅन्सर विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बंगळूर, मंड्या आणि गुलबर्गा येथे कॅन्सर रुग्णालये उपलब्ध आहेत, पण दूरच्या भागांतील रुग्णांसाठी तेथपर्यंत पोहोचणे कठीण होते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयांत कॅन्सर विभाग सुरू करण्याचा पर्याय विचारात घेतला गेला आहे.
प्रायोगिक तत्त्वावर बेळगावसह दहा जिल्ह्यांत कॅन्सर विभाग सुरू केला जाणार आहे. यामध्ये बळ्ळारी, रायचूर, कोप्पळ, म्हैसूर, मंगळूर, शिमोगा, दावणगिरी, विजापूर आणि कारवार या जिल्ह्यांचा समावेश आहे. या विभागांसाठी स्वतंत्र खोली, प्रशिक्षित डॉक्टर, आणि आवश्यक निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
गुलबर्गा जिल्हा रुग्णालयाचा दर्जा वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, कारण कल्याण कर्नाटक भागातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय कॅन्सर रुग्णालय उभारण्यासाठी बेळगाव, बळ्ळारी, शिमोगा आणि म्हैसूरमध्ये जागेची पाहणी करण्यात आली होती, परंतु त्यासाठी लागणाऱ्या मोठ्या खर्चामुळे हा प्रकल्प रखडला होता त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे.
बंगळुरातील किडवाई रुग्णालयात दरवर्षी २६ हजार कॅन्सर रुग्णांची नोंद होते. येथे किमोथेरपी आणि रेडिओथेरपीसाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण येतात. किडवाई रुग्णालयातील डॉक्टरांना जिल्हा रुग्णालयांमध्ये सेवा देण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.
याशिवाय जिल्हा रुग्णालयांत आवश्यक उपकरणे आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, ज्यामुळे रुग्णांना त्यांच्या जवळच्या ठिकाणी उपचार घेता येणार आहेत. सरकारच्या या पावलामुळे कॅन्सर रुग्णांना सोयीस्कर उपचार मिळणार असून त्यांचे हाल कमी होण्यास मदत होईल.
बेळगावसह बळ्ळारी, रायचूर, कोप्पळ, म्हैसूर, मंगळूर, शिमोगा, दावणगिरी, विजापूर, कारवार जिल्हा रुग्णालयात कॅन्सर विभाग सुरु केला जाणार आहे.